समतेचे तत्व घरातूनच पाळणे सुरू करावे-प्रा. लक्ष्मण यादव

0
34

शिक्षणातूनच डॉ. बाबासाहेबांना श्रद्धांजली

गोंदिया, -. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासूनच वर्णव्यवस्थेचे चटके सहन करावे लागले. ते चित्र त्यांच्या मनावर बिंबले. त्यामुळे वर्णव्यवस्थेची असमानता मोडून काढत समता, न्याय आणि बंधुता हे तत्व रुजविण्याचा त्यांचा संकल्प होता. त्याकरिता त्यांनी संपूर्ण आयुष्य झिजविले. अस्पृशांना त्यांनी न्याय मिळवून दिला. मात्र आजही काही असामाजिक तत्व डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेली व्यवस्था मोडण्यासाठी सक्रिय आहेत. आपल्यावर जुने दिवस येवू नयेत, याकरिता आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण द्यावे. स्त्री-पुरूष समानतेचे तत्व घरातूनच रुजविण्याची सुरुवात करावी, असे मत दिल्ली विश्वविद्यालयाचे प्रा. लक्ष्मण यादव यांनी व्यक्त केले.
सुभाष शाळेच्या आवारात प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सामाजिक जयंती उत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते गुरुवारी बोलत होते. व्यासपिठावर अखिल भारतीय कुर्मी किसान मजूर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार बघेल, दंगलकार विद्रोही कवी नितीन चंदनशिवे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष सविता उके आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. लक्ष्मण यादव पुढे म्हणाले, देशात 90 टक्के लोकसंख्या असलेल्या घटकावर अन्याय सुरू आहे. त्यांना संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या हक्काचे हनन करणे सुरू आहे. संविधानाची मोडतोड सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य रंजल्या-गांजल्यांसाठी समर्पित केले. त्यांनी त्याकरिता अहोरात्र लढा देत कायदा केला. मात्र त्याच कायद्यावर गेल्या काही वर्षांपासून टाच आणली जात आहे. आम्ही उघड्या डोळ्यांनी सर्व बघत आहोत. रात्र वैऱ्याची असून आता त्याविरोधात पेटून उठण्याची गरज आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे तत्व देशात कायम राहावे, यासाठी आपले कोण आणि परके कोण हे ओळखावे लागणार आहे. केंद्र शासनाने दोन वर्षांपासून लागू केलेले शिक्षण धोरण घातक आहे. त्यात आता सार्वजनिक उपक्रम विकण्याचा सपाटा सुरू केल्यामुळे नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. बहुजन समाजाने आपल्या न्याय हक्कांकरिता लढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी नंदकुमार बघेल यांनी कृषी धोरण, समाजाची व्यवस्था तसेच नितीन चंदनशिवे यांनी समाजव्यवस्थेवर आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रहार केला.