नागपूर,दि.११- ओबीसी युवा अधिकार मंच व इतर सहयोगी संघटनाच्या वतीने जातीनिहाय जनगणनेसाठी ३ ते ७ ऑगस्ट दरम्यान विदर्भातील सात जिल्ह्यातून मंडल यात्रा काढण्यात येणार, असल्याची माहिती यात्रेचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी पत्रपरिषदेत दिली.यात्रेला संविधान चौक नागपूर येथून प्रारंभ होणार आहे. नागपूरमार्गे वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातून मंडल यात्रेचा प्रवास होणार असून ७ आॅगस्टला गोंदियात यात्रेचा समारोप होणार असल्याचे कोर्राम यांनी सांगितले.तसेच समारोपाला प्रसिध्द विचारवंत प्रा.लक्ष्मण यादव येणार आहेत.
ते म्हणाले, केंद्र सरकारद्वारे ७ ऑगस्ट १९९० रोजी मंडल आयोग लागू करण्यात आला. त्यामुळे ओबीसी समाजाला आरक्षण प्राप्त झाले.मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे वंचित ओबीसी समाज मुख्य प्रवाहात येत आहे. ७ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात मंडल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या औचित्याचे जातीनिहाय जनगणनेचा महत्त्वाचा विषय घेऊन मंडल यात्रा काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.ओबीसी समाजाकडून अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली जात आहे. परंतु, केंद्र तथा राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार ओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के होती.
परंतु, १९३१ पासून तर आजपर्यंत जातीनिहाय जनगणना झाली नाही. त्यामुळे लोकसंख्येसह सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थिती समजून येत नाही. जर भारताला महासत्ता बनायचे असेल तर सर्व घटकांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे.विकासाच्या दृष्टीने धोरण ठरविण्यासाठी भारत सरकारकडे डेटा असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने भारताची जातीनिहाय जनगणना करावी. यासाठी ओबीसी, एस.सी., एस.टी. समाजात जनजागरण झाले पाहिजे, या उद्देशाने मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कोर्राम यांनी सांगितले. पत्रपरिषदेला संघटक दीनानाथ वाघमारे, कृतल आकरे, पंकज सावरबांधे, यजुर्वेद सेलोकर, राहुल वाढई आदी उपस्थित होते.