पोलिसांनी चांगले काम करुन प्रतिमा उंचावावी-पालकमंत्री शंभूराज देसाई 

0
17
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांचा सत्कार
वाशिम दि.०१- सर्वच अडचणीवर मात करून पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. कोरोना काळात पोलिस अठरा-अठरा तास कर्तव्यावर होते. समाजाने पोलिसाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला पाहिजे. जिल्ह्यात पोलिस दलाने चांगले काम केले आहे. आपण लोकांच्या सेवेसाठी आहोत या भावनेतून पोलिसांनी काम करावे. पोलिसांनी आणखी चांगले काम कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील राहून आपली प्रतिमा आणखी उंचावावी असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
            आज १ मे रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित उत्कृष्ट पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री.देसाई बोलत होते. मंचावर आमदार एड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी वसुमना पंत व पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची उपस्थिती होती.
             श्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात नागरिकांच्या पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारीना तात्काळ प्रतिसाद मिळतो. डायल ११२ वर तक्रारदाराने किंवा पीडितेने केलेल्या तक्रारीची १४ व्या मिनिटात दखल घेतली जाते. लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम देखील पोलीस करतात.तसेच कायदा व सुव्यवस्थेचा ताण पोलिसांवर पडतो. एखादी घटना घडली तर त्यावर नियंत्रणासाठी पोलिसांना त्वरित निर्णय घ्यावा लागतो. चांगल्या लोकांचे रक्षण करण्याची आणि दुर्जनांना शिक्षा करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस सदैव सज्ज असतात.पोलिसांची पहिली चांगली बाजू फार कमी प्रमाणात समोर येते. दुसरी बाजू मोठ्या प्रमाणात पुढे आणण्यात येते. वाशिमसारख्या छोट्या जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांनी पोलिसांना विश्वासात घेऊन चांगले काम केले आहे. मंत्रिमंडळाने केवळ आरोग्य आणि पोलिस विभागातील पदभरतीला मान्यता दिली आहे. राज्यात १२ हजार ६०० पोलिसांच्या भरती प्रक्रियेला परवानगी मिळाल्याने भविष्यात पोलिसांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
         पोलिसांची शासकीय निवासस्थाने जुनी असल्याने जीर्ण झाली आहे असे सांगून श्री देसाई म्हणाले, पोलिसांना चांगल्या शासकीय निवासस्थानी राहता यावे यासाठी पोलीस गृहनिर्माणसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात येत आहे. सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात पोलिसांच्या घरांसाठी २५० कोटी रुपये,सन २०२०-२१ या वर्षात ४५० कोटी रुपये,सन २०२१-२२ मध्ये ८२५ कोटी रुपये आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.जिल्ह्यात पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी मदत करण्यात येत आहे.जिल्हा नियोजन समितीमधून आधुनिक व चांगली वाहने पोलीस विभागाला देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षा प्रकल्पाला महिला आणि मुलींचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पथदर्शी प्रकल्प राज्यभर राबवण्याचा दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवावा लागेल. जिल्ह्यात सेवा कक्षाच्या माध्यमातून तक्रारदार/ पीडित त्यांच्या तक्रारीची तत्परतेने दखल घेऊन तक्रारदाराचे समाधान होत असल्याचे प्रमाण ८७ टक्के असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
                  प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक बच्चन सिंह म्हणाले, जिल्ह्यातील सर्व सण, उत्सव, यात्रा व जयंती कार्यक्रम शांततेत पार पडले. मागील सहा महिन्यात भाग १ ते ५ एकूण ११८० गुन्हे दाखल असून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ८० टक्के आहे.एमपीडीए, मोका व तडीपारीची कारवाई जिल्ह्यात करण्यात येत आहे. डायल ११३ वर पीडित व संकटग्रस्त व्यक्तीला १४ व्या मिनिटाला प्रतिसाद देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीमधून चारचाकी व दुचाकी वाहने जिल्हा पोलिस दलाला उपलब्ध झाली आहे. निर्भया पथकाच्या माध्यमातून महिला व मुलींच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. पोलिसांसाठी निवासस्थानाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे वाशिम पोलीस दलास बेस्ट वेल्फेअर युनिट म्हणून सन्मानित करण्यात आले. दक्षता पेट्रोल पंपाला औरंगाबाद विभागातील ८ जिल्हयापैकी विक्री – सेवा सुधारणासाठी उत्कृष्ट पेट्रोल पंप म्हणून प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
         अप्पर पोलीस अधीक्षक श्री. भामरे यांनी जऊळका(रेल्वे) पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या ज्येष्ठ नागरिक दुहेरी खून,मालेगाव येथील सराफा कामगार याची हत्या, वाशिम शहर पोलीस स्टेशनअंतर्गत घरात घुसून चाकूचा धाक दाखवून मुद्देमाल चोरी आदी प्रकरणात सर्व आरोपींना अटक केल्याची माहिती दिली.
        पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू , प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
           पोलीस उपनिरीक्षक अश्विनी धोंडगे यांनी निर्भया पथकाचा उद्देश, कार्यप्रणाली आणि कामगिरीबाबतची माहिती यावेळी दिली.
           पालकमंत्री यांचे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आगमन होताच पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी श्री.देसाई यांनी सेवा कक्षाचे फीत कापून उद्घाटन केले.या कक्षात ड्युटीवर असलेल्या कर्मचारी पुष्पा मनवर आणि कोमल गाडे यांचेकडून तक्रारदार/पीडितेच्या तक्रारीची तत्परतेने दखल घेऊन कशाप्रकारे तक्रारदाराचे समाधान करण्यात येते तसेच आतापर्यंत किती तक्रारी प्राप्त झाल्यात याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली.
        कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम,अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांचेसह अन्य पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी, नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सहायक पोलीस निरीक्षक भारत लसंते यांनी केले.उपस्थितांचे आभार सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांनी मानले.