पालकमंत्र्यांनी केली कृषी संकुलाच्या बांधकामाची पाहणी

0
17
वाशिम दि.०२= पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी १ मे रोजी वाशीम येथील सुंदर वाटिका परिसरात बांधण्यात येत असलेल्या राज्यातील पहिल्या स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुल इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार एड. किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी
वसुमना पंत,सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. मिठ्ठेवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        श्री देसाई यांनी बांधकामाची पाहणी करतांना कार्यकारी अभियंत्यांना काही सूचना केल्या. संकुलाचे बांधकाम ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. बांधकाम वेगाने पूर्ण करताना बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली असावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला दिशा देणारा देणारे हे कृषी संकुल असल्यामुळे बांधणीचे काम पूर्ण होताच शेतकऱ्यांना त्या संकुलातून चांगल्या प्रकारे कृषी विषयक प्रशिक्षण व कृषी प्रात्यक्षिके मिळण्यास मदत होणार असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.
            कृषी संकुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी ४४ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून बांधकामावर आतापर्यंत २ कोटी रुपये खर्च झाला आहे.संकुलाचे ६० टक्के बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मिठ्ठेवाड यांनी दिली.