कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे घ्यावीत विभागीय कार्यशाळेत सुनिल केदार यांच्या सूचना

0
10

नागपूर, दि.8 : विदर्भात एकूण क्षेत्राच्या तीस टक्के क्षेत्र कापसाखाली आहे. परंतु नेहमी कीड व निसर्गाच्या अवकृपेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.  या शेतकऱ्यांना विविध योजना व किडीचे व्यवस्थापन यांची माहिती व्हावी. यासाठी कृषी विभागाने ग्रामीण भागात मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावी, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने केंद्रीय कापूस संशोधन संस्था, कापूस संचालनालय, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, व पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सौजन्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विभागीय कार्यशाळाचे आयोजन शहरातील वसंतराव नाईक स्मृती सभागृह (वनामती) येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ.वाय.जी.प्रसाद, ज्येष्ठ कृषी तज्ञ सी.डी. माही, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगूरु व्ही. एम. भाले, कापूस संचालनालयाचे संचालक ए.एल. वाघमारे, विलास खर्चे, एम.जी. वेणूगोपाल, कृषी सहसंचालक रविंद्र भोसले आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था उंचावली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने महात्मा गांधीचे ‘गाव बनाव देश बनाव’ या संकल्पनेस न्याय देऊ शकू असे श्री. केदार यांनी सांगितले. या विचारधारेचे चिंतन व मनन करणे आजच्या काळाची गरज आहे. शेतकरीच देशाचे चित्र बदलवू शकतो. त्यासाठी शेतीसोबतच पूरक व्यवसाय करावा. देशातील 70 लाख शेतकरी कापूस उत्पादन करतात. परंतु त्यांना आधुनिक तंत्रज्ञान व कीडीचे व्यवस्थापनाबाबत माहिती नसल्याने त्यांना दरडोई उत्पनात घट होत असते. यासाठी कृषी विभागाने ग्रामीण भागात प्रसार व प्रचार करुन शेतकऱ्यांना याबाबत माहिती दयावी, असे ते म्हणाले.

कापूस पिकाला पाणी भरपूर लागते, त्यासाठी ड्रिप एरिगेशनबाबत मंत्रीमंडळात ठराव ठेवून त्यांचा पाठपूरावा करणार आहे, अशी माहिती देऊन श्री.केदार म्हणाले. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेणखताचा जमीन उपयोग करावा. बियाणे घेत असतांना काळजी घ्यावी व त्यांचे देयक घ्यावे, नाहीतर शेतकऱ्यांची फसगत होण्याची भिती असते.  क्रॉपिंग पॅटर्न कसे तयार करावयाचे, त्याचा हिशोब कसा ठेवायचा यांची माहिती घ्यावी. त्याबरोबरच शेतात दुबार पिक घेतल्याने उत्पन्नात वाढ होते. बोंडअळी नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर करा. तसेच दर पंधरा दिवसात फवारणी करा, त्यामुळे कीड नाहीशी होऊन कापूस उत्पादनात वाढ होईल. कडुलिंब हे सर्वगुण संपन्न झाड असून त्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

उत्पादन क्षेत्र व उत्पन्न वाढीसाठी  कमी दिवसात येणारे कापसाचे बियाण्यांची निवड करावी. कमी खर्चात अधिक उत्पन्न घ्यावे. गुलाबी बोंड अळीमुळे कापसाची मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यावर बंधन प्रकल्प राबविल्यास (राखी बांधणे) बोंड अळीचा नाश होतो. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ सी.डी. माही यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. कापूस पिकाबाबत शेतकऱ्यांना गावोगावी चर्चा सत्राद्वारे मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विभागात अमरावती व नागपूर जिल्ह्यात कापूस उत्पादकता जास्त आहे. याभागात ऑरगॉनिक कॉटन, रंगीत कापूस लागवड केल्यास उत्पादनात वाढ होईल. त्यासोबतच वृक्षाची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे  केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. बंधन प्रकल्प शेतात राबविल्यास कापसावरील कीड नियंत्रण व व्यवस्थापन करणे शेतकऱ्यांना सोयीचे होईल. यासाठी लवकरच एकात्मिक सल्लागार समितीची स्थापना करुन ध्वनी संदेशाद्वारे पिकांची व त्यावरील रोगांबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगूरु व्ही. एम. भाले, डॉ. ए.एल. वाघमारे, सहसंचालक रविंद्र भोसले, विलास खर्चे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला. कृषी विभागाच्या मार्गदर्शनपर घडीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने कृषी विषयक प्रदर्शनीचे आयोजनही करण्यात आले. ही कार्यशाळा दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही सत्रात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ वैज्ञानिक कीटकशास्त्र डॉ. बाबासाहेब फंड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार      डॉ. सुनील रोकडे यांनी मानले. या कार्यक्रमास विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.