कोरोनामुळे अनाथ झालेल्या 11 बालकांना 15 लाखाच्या पॅकेजचे वितरण
प्रयोजकता योजनेत 2 हजाराची वाढ
प्रधानमंत्री यांचा मुलांशी संवाद
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन
गोंदिया दि. 30 : कोरोना या महामारीची जगातील प्रत्येक देशाला झळ बसली आहे. या संकटाच्या काळात केंद्र सरकार देशवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. असे असतांना सुद्धा काही बालकांना आपले माता-पिता गमवावे लागले. अशा सर्व बालकांच्या पाठीशी देशाची संवेदना आहे. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देश आपल्या पाठीशी आहे. स्वतः वर भरोसा ठेवा तुमचे जीवन प्रकाशमान होईल असा भरोसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला.
कोरोना महामारीमध्ये ज्यांचे आई-वडील मृत्युमुखी पडले अशा अनाथ बालकांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एका विशेष कार्यक्रमात ऑनलाईन संवाद साधला. गोंदिया जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 11 असून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात या बालकांना पंधरा लाखाचे पॅकेज हस्तांतरित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, सहायक प्रकल्प अधिकारी समा मिश्रा, बाल न्याय मंडळ सदस्य अँड. मेघना भंगणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, रेखा बघेले, मुकेश पटले व रवींद्र टेंभुर्णे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.
केंद्र व राज्याच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात येथे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत बालकांना यासंदर्भातील दस्तऐवज प्रदान करण्यात आले. यात पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड ‘ योजनेत 10 लाख रुपये व 5 लाख रुपये किंमतीचे हेल्थ कार्डचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने या मुलांच्या नावे यापूर्वीच पाच लक्ष रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र वितरित केले आहे.
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला. सर्वप्रथम केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी नवी दिल्ली येथून उपस्थितांना कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधला. चांगल्या पुस्तकांशी मैत्री करा, फिट इंडिया अभियानात सहभागी व्हा, योग जीवनाचे अंग बनवा असा सल्ला त्यांनी बालकांना दिला. अनाथ बालकांसाठी असलेल्या प्रयोजकता योजनेचा निधी दोन हजार रुपये प्रति माह होता आता तो चार हजार रुपये करण्यात येत असल्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली.
कोरोना महामारीमुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड ‘ निधीतून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या मुलांना वयाच्या 23 वर्षापर्यंत मासिक स्टायपेंड देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय आयुष्यमान भारत योजनेतून मुलांना पाच लक्ष रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. त्याचा प्रीमियम देखील पीएम केअर्स फंडातून भरला जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 588 आहे. मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये जिल्ह्यातील 303 मुलांचे आई किंवा वडील गेलेल्याचा समावेश आहे. 11 मुलांचे आई आणि वडील दोघेही या महामारीत मृत्युमुखी पडले आहे. केंद्र शासनासोबत राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. या मुलांना आयुष्यात प्रतिष्ठा आणि संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार या मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची, निवाऱ्याची व्यवस्था शासन करणार आहे. या संदर्भातील सर्व दस्तऐवज आज मुलांना वितरीत करण्यात आले. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह स्नेह प्रमाणपत्र वितरित केले. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या मार्गदर्शनात महिला व बालकल्याण अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी-कर्मचारी यांच्या चमूने या कार्यक्रमाचे स्थानिक स्तरावर आयोजन केले होते.
*जिल्हाधिकारी नयना गुंडे*
या संकटाच्या काळात आपण एकटे नसून केंद्र व राज्य सरकार आपल्या सोबत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपणास प्राधान्याने देण्यात येईल. फक्त तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासन शक्य ती सर्व मदत करणार आहे. राज्य व केंद्र सरकारने दिलेल्या मदत निधीचा विनियोग आपल्या प्रगती व विकासासाठी करा. आम्ही आपल्या सोबत सदैव आहोत असा आधार जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिला.