
तुमसर,दि.31ः- भंडारा जिल्ह्यातील किसना गर्जना संघटनेचे नेते इंजि.राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात आज 31 मे रोजी धानाला बोनस व खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी निघालेल्या भव्य ट्रक्टरमोर्च्याने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला.या मोर्च्यात शेकडोच्या संख्येने ट्रक्टर व हजारोच्या संख्येने शेॆतकरी सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुकी दरम्यान धानाला पाचही वर्ष रू ७००/- प्रति क्विंटल बोनस देऊ असे वचन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी ५ वर्षासाठी शासनाला निवडून दिले.परंतु वचनपूर्ती न कर्ता यावर्षी महाविकास आघाडी सरकारने बोनस गहाळ करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप इंजि.राजेंद्र पटले यांनी केला.शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल असे सुध्दा वचन दिले होते,तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हज्जार प्रोत्साहन राशी देण्यात येईल असे वचन सुध्दा दिले होते,परंतु वचन पुर्ण न केल्यामुळे शेतकरी बांधवात आक्रोश निर्माण झालेला आहे.