वाशिम जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन साजरा

0
18
वाशिम दि.६- छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहे.या महापुरुषाच्या व लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ अर्थात शिवराज्याभिषेक दिन.याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्यभिषेक झाला होता. याच दिवसाचे औचित्य साधून आज ६ जून रोजी वाशिम जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे आणि कल्पना राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या ईमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन प्रतिकात्मक स्वराज्याची गुढी उभारण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा व स्वराज्याचा जयघोष करण्यात आला.
प्रारंभी जि.प. शाळेच्या विद्यार्थीनींनी राष्ट्रगीत गायले. कवी व शाहीर विलास भालेराव,शाहिर सुमेधानंद भालेराव आणि नितीन भालेराव यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करुन शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवस्वराज्य दिन कार्यक्रमासाठी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी केले.