
* संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी
गोंदिया- केवळ स्पर्धा किंवा पुरस्कारासाठी क्षणिक दिखावा न करता गावाचा शाश्वत विकास कसा होईल यासाठी सर्वच नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21, 2021-22 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अनुषंगाने जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या वतीने अंतिम जिल्हास्तरीय तपासणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी ते ग्रामपंचायती मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिनांक 7 जून ते 9 जून दरम्यान गोंदिया तालुक्यातील गंगाझरी, तिरोडा तालुक्यातील नहरटोला, नवेझरी, गोरेगांव तालुक्यातील सटवां, बबई, आमगाव तालुक्यातील सोनेखारी, सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पवणी/धाबे, कवठा, निमगाव तसेच जनवा या गावांची तपासणी करण्यात आली. यावेळी समिती सदस्यसचिव म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नरेश भांडारकर, समिती सदस्य म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गोविंद खामकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, शिक्षणाधिकारी प्राथ. कादर शेख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता जतपेले, महिला व बालकल्याण विभागाचे विनोद जाधव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समन्वयक भागचंद्र रहांगडाले यांच्यासह जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे अतुल गजभिये, तृप्ती साकुरे, शोभा फतिंग, राजेश उखळकर, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आदि उपस्थित होते. तपासणी दरम्यान परिशिष्ट 2 च्या अनुषंगाने गावचे मूल्यांकन करण्यात आले. तपासणी दरम्यान समितीच्या वतीने शाळा व आंगणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची पाहणी करण्यात आली.