१८२ ग्राम पंचायतीवर २.८४ कोटीचे वीज देयके थकीत

0
15

गोंदिया- महावितरणवर थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असल्याने डबघाईस येण्याच्या मार्गावर आहे. महावितरणकडून वसुली मोहिम राबविण्यात येत असूनही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच जिल्ह्यातील १८२ ग्राम पंचायतीवर विज बिलाचे २ कोटी ८४ लाख ६१९८ रुपए थकीत आहेत. यामुळे या गावातील पथदिव्यांचा विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. विज पुरवठ्याअभावी पावसाळ्यात ग्रामीणांची चांगलीच कोंडी होणार आहे.
गावात लावण्यात येणार्‍या पथदिव्यांचा विज बिलांचा प्रश्न मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. गावातील पथदिव्यांचा विज बिल जिल्हा परिषदेकडून भरण्यात येत होते. परंतु, शासनाने यावर बंदी आणली. त्यामुळे विज भरणे ग्राम पंचायतीला भाग पडले. परंतु, महिन्याकाठी येणारा भरमसाठ विज बिलाने ग्राम पंचायतीने गणित बिघडविले. आणि थकीत बिल वाढत गेला. त्यातही विज बिल भरणा करणे ग्राम पंचायतींना अशक्य होत असल्याने कोंडी निर्माण झाली. या सर्व प्रकारावर शासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. तर दुसरीकडे महावितरणकडून बिल वसुली न झाल्याने १८२ ग्राम पंचायतीतील पथदिव्यांचा विज पुरवठा खंडीत आला. पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या १८२ ग्राम पंचायतीवर महावितरणचे २ कोटी ८४ लाख ६१९८ रुपए थकीत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर गावे अंधारात असून ग्रामीण भागात किटक, सरपटणार्‍या प्राण्यांचा धोका असतो. अशा परिस्थिती विज पुरवठा खंडीत असल्याने गावकर्‍यांची चांगलीच कोंडी होणार आहे.