गोंदिया नगर परिषदेतील मिळकतीचे ड्रोनद्वारे मोजणी

0
31
OLYMPUS DIGITAL CAMERA

 गोंदिया,दि.25 : महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील 27 जुलै 2020 रोजीचे शासन निर्णयानुसार गोंदिया शहराचे व गोंदिया शहर नगर परिषदेच्‍या हद्दीमध्ये काही गावांचा अंशत: समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये गोंदिया (बुज), गोंदिया खुर्द, कटंगीकला, कुडवा, नंगपूरा/मुर्री, पिंडकेपार अशा एकूण 6 गावातील नगर परिषद हद्दीतील मिळकतीचे ड्रोनद्वारे मोजणी पुढील आठवड्यापासून करण्यात येणार आहे.

          त्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील 27 एप्रिल 2020 रोजीचे पत्रानुसार पथदर्शी प्रकल्प खाजगी संस्थाकडून राज्यातील 5 नगर पालिका क्षेत्रातील पथदर्शी नगर/शहर भूमापन आधुनिक तंत्रज्ञान ड्रोनच्या सहाय्याने करावयाचे असून या कामी गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया नगर परिषदेची निवड करण्यात आलेली आहे. सदर पथदर्शी प्रकल्पांतर्गत नगर परिषद हद्दीतील शहर भूमापन करण्यात येणार आहे. सदर शहर भूमापन केल्याने शासनाचे मालकीच्या मिळकतीचे संरक्षण होईल, मिळकतीचा विहीत परिमाणात नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे याची नोंद होईल. शहर वासियांचे नागरी हक्काचे संवर्धन होईल. शहराचे रस्ते, शासनाच्या मिळकती, नगर परिषदेतील खुल्या जागा, नाले इत्यादीच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे मालकी हक्काचे पुरावे प्राप्त होतील. मिळकत धारकांना घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. नगर परिषदेची कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल.

       तरी गोंदिया नगर परिषद हद्दीतील नागरिकांनी ड्रोन सर्व्हे करण्यापूर्वी आपल्या मिळकतीचे चुन्याचे/पेंटने सिमांकन करुन घ्यावे. सुरुवात होणाऱ्या सर्व्हेक्षण कामी नगर परिषद कर्मचारी व जनतेने स्वयंस्फुर्तीने सर्व्हे करणाऱ्या पथकांना सहकार्य करावे. असे आवाहन उप अधीक्षक भूमी अभिलेख गोंदिया व मुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया यांचेद्वारे करण्यात येत आहे.