नवेगाव बांध येथील जलाशयात पूर परिस्थितीची रंगीत तालीम

0
37

गोंदिया : मान्सूनपूर्व तयारी 2022 च्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया तर्फे पूर परिस्थितीमध्ये शोध बचावकार्य संबंधाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील जलाशयात 24 जून 2022 रोजी शोध व बचाव पथकाद्वारे पुरात उपयोगी पडणारे शोध बचाव साहित्यांची तपासणी करून रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळेस पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना सुरक्षित व सुखरूप बाहेर काढण्यासाठी कशाप्रकारे शोध व बचाव कार्य राबविण्यात येते ? याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

मागील वर्षी 2021 मध्ये राज्यात आलेली पूर परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्यात नागरिकांसाठी शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम व पूरपरिस्थितीमध्ये सुरक्षा व बचाव कसे करावे ? याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. पूर परिस्थितीमध्ये जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया तर्फे सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नागरिकांना पूरपरिस्थितीमध्ये तात्काळ मदत पुरविण्यासाठी जिल्हा शोध व बचाव पथकातर्फे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने गावपातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच हवामान खाते व पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्याकरिता तालुका व गाव पातळीवर व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येत आहे.

सदर रंगीत तालीम कार्यक्रमात तहसीलदार अर्जुनी मोरगाव विनोद मेश्राम, एल.जी. मुंदडा उपअभियंता सा.बा. जि.प. गोंदिया, एच.टी. निमजे उपअभियंता सडक अर्जुनी, विजय हटवार कनिष्ठ अभियंता,  एस.एच. शहारे कनिष्ठ अभियंता एल.आय. पटले शाखा अभियंता, एल.एस. दुबे उपअभियंता, सा.बा. जि.प. आमगाव एस.टी. डोंगरे शाखा अभियंता व  शोध बचाव पथकाचे सदस्य नरेश उईके, राजकुमार खोटेले,  जसवंत रहांगडाले, रविंद्र भांडारकर, संदीप कराडे, दिनू दिप, राजाराम गायकवाड, महेंद्र ताजने, दुर्गप्रसाद गंगापारी, मनोज केवट, इंद्रकुमार बिसेन, तलाठी, कोतवाल व मंडळ अधिकारी व कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

आवाहन….

नैसर्गिक आपत्तीचे संदेश आता SMS द्वारे…..

नागरिकांनी आपले मोबाईल नंबर रजिस्टर करावे- जिल्हाधिकारी नयना गुंडे

जिल्ह्यातील पूर प्रवण 96 गावांमधील नागरिकांसह जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नैसर्गिक आपत्ती विषयक सूचना, संदेश, इशारा व माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपले चालू मोबाईल क्रमांक मधून खालील मोबाईल नंबर व लँडलाईन क्रमांकावर डायल करून आपले मोबाईल क्रमांक पंजीकृत करावे. 9404991599 किंवा 07182- 230196 वरील क्रमांकावर पंजीकृत मोबाईल धारकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया यांचेमार्फत विविध प्रकारच्या आपत्ती विषयक सूचना, संदेश, इशारा व माहिती चे SMS पाठविण्यात येणार आहे, तरी सर्व नागरिकांनी आपले मोबाईल क्रमांक पंजीकृत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.