अर्जुनी मोर तालुका सरपंच सेवा संघाची मागणी
अर्जुनी-मोर,दि.29ः- गावागावातील पथदिवे थकित वीज बिलामुळे बंद करण्यात आल्याने अर्जुनी-मोर तालुक्यातील सर्व गावात पथदिव्यांची वीज कापण्यात आल्याने अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. हे थकीत वीज बिल भरण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत सरपंच सेवा संघ तालुका शाखा अर्जुनी-मोरच्या वतीने 28 जून रोजी अर्जुनी-मोर पंचायत समिती सभापती व खंडविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात अर्जुनी-मोर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचे पथदिवे विद्युत विभागाने खंडित केले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. अर्जुनी मोर तालुका आदिवासीबहुल व्याघ्रप्रकल्पग्रस्त व नक्षलग्रस्त असून व्याघ्र प्रकल्प लगतच्या गावांना नेहमी वन्यप्राण्यांकडून धोका असतो. हे संकट मानवनिर्मित असून ते दूर करण्यासाठी थकीत वीज बिलाची रक्कम आपल्या कार्यालयामार्फत भरणा करून तात्काळ पूर्ववत पथदिवे सुरू करून अंधार दूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अर्जुनी मोर तालुका ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष भोजराम लोगडे, सरचिटणीस अशोक कापगते व अर्जुनी-मोर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच उपस्थित होते.