
गोंदिया : प्रशासनात महसूल विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग असून या विभागात कार्यरत प्रत्येक कर्मचारी जनसेवक असून प्रशासनिक कामात प्रमाणिकता व पारदर्शिता कायम करणारा कणा आहे. त्यामुळे नागरिकांच्या विविध प्रकारच्या अडी अडचणी समजून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील यांनी केले.
महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, स्मिता बेलपत्रे व अधिकारी उपस्थित होते.
हायटेक युगामध्ये महसूल प्रशासनात काम करताना अनेक आव्हाने येत असून अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी वाढली आहे. तसेच काळाच्या गरजेनुसार कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यक बदल देखील घडवून आणणे महत्त्वाचे आहे.आधुनिक युगात ई-गव्हर्नन्स मुळे प्रत्येक कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे मनुष्यबळ आवश्यक आहे असे श्री. पाटील यांनी सांगितले.
महसूल प्रशासनात काम करताना लोकांच्या अडी-अडचणी समजून सकारात्मक वागणूक देणे ही आपली जबाबदारी आहे. प्रशासन आणि नागरिक हे समाजातील दोन घटक आहेत आणि या दोन्ही घटकांमध्ये समन्वय ठेवणे ही आपली जबाबदारी आहे असे श्री अनिल पाटील म्हणाले.
महसूल विभागाच्या निर्मितीचा इतिहास व आतापर्यंतची या विभागाची वाटचाल अतिशय सोप्या भाषेत अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी विषद केली. सर्व शासकीय विभागाचे मूळ हा महसूल विभाग असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्टपणे नमूद केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील लोकशाहीची संकल्पना सार्थ करणारा विभाग म्हणजे महसूल विभाग होय असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख उपस्थितीत धान्य खरेदी अधिकारी श्रीमती लीना फलके, प्र. उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय रुपेशकुमार राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास संजय धार्मिक अधीक्षक आस्थापना, उप कोषागार अधिकारी लखीचंद बाविस्कर, मंदार जोशी लेखाधिकारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख, आप्पासाहेब व्हनकडे नायब तहसीलदार, सहायक नियोजन अधिकारी पूजा पाटील, सीमा वानखेडे सहाय्यक लेखाधिकारी, जिल्हा नाझर राकेश डोंगरे, आकाश चव्हाण, दीपक परिहार, किशोर राठोड, संतोष शेंडे, नीलकंठ कावळे, मारुती केंद्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.