राज्य निवडणूक आयुक्तांच्या सूचना :निवडणूक प्रक्रियेतही ‘व्हॉटस्अँप’चा वापर

0
22

नागपूर : निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करायला सुरुवात केली आहे, त्याचे चांगले परिणामही त्यांना मिळाले आहेत. आता राज्य निवडणूक विभागसुद्धा निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान व्हावी, यादृष्टीने सोशल मीडियाचा वापर करणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी बुधवारी येथे तशा सूचना दिल्या आहेत. तसेच यावेळी सन २0१५ या निवडणुकीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले उप विभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर, जितेंद्र पाटील, मनीषा दांडगे तहसीलदार शीतलकुमार यादव,तहसिलदार प्रताप वाघमारे, राजून रणवीर, श्रीमती वंदना सौरंगपते यांचा ज. स. सहारिया यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला.
मार्च २0१७ पर्यंत मुदत संपणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक आणि कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. मतदार यादीचे विभाजन महाऑनलाईनतर्फे तयार केलेल्या आज्ञावलीनुसार संगणकामार्फत करावे. मतदार यादीचे अद्ययावतीकरण बिनचूक करण्यात यावे तसेच झोनल ऑफिसर, मतदान केंद्राध्यक्ष व निवडणूक निरीक्षकांचा व्हॉटस्अँप ग्रुप तयार करावा, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. इतकेच नव्हे तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, प्रभाग रचना करणे, मतदार यादी प्रभागनिहाय करणे, मतदानाची आकडेवारी गोळा करणे, मतदारांना मतदानाबाबत एसएमएस करणे, मतदार यादीत नाव शोधण्यासाठी संगणकाचा उपयोग करणे, निवडणुकीशी संबंधित कामांबाबत संगणक आज्ञावली तयार करणे आदी सूचनाही सहारिया यांनी केल्या.