विद्यार्थ्यांनी जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव त्वरित सादर करावे

0
15

गोंदिया, दि.20 : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात सीईटी, जेईई, नीट यासारख्या प्रवेश पात्रता प्रक्रियेमधून व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. इयता 12 वी विज्ञान तसेच पदवी अभ्यासक्रमानंतर बी.ई., बी.टेक., मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्ट, पशुवैद्यकीय, एमबील, एमसील, विधी, बी.एड. यासारख्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतांना सामाजिक आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी याकरीता सीईटी, जेईई, नीट व तत्सम प्रवेश परीक्षा दिल्या असतील तर काहींचे निकालही प्राप्त झालेले असतील, अशा मागासवर्गीय (अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र) विद्यार्थ्यांनी त्यांचे जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव बार्टी, पुणे च्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन पध्दतीने भरावे. तसेच त्यासोबत मुळ कागदपत्रे, दाखले, शपथपत्र अपलोड करावे व त्याची हार्ड कॉपी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, गोंदिया येथे सदर प्रवेश प्रक्रियेच्या परीक्षेचे निकालपत्र अथवा प्रवेश पत्रासह तात्काळ दाखल करावे.

        अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी 10 ऑगस्ट 1950, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांनी 21 नोव्हेंबर 1961 तसेच इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गच्या विद्यार्थ्यांनी 13 ऑक्टोबर 1967 च्या पुर्वीचे अथवा त्या तारखेस त्यांचे कुटूंबियांचे जात नोंदीचे तसेच गोंदिया जिल्ह्याचे सर्वसाधारण अधिवासाचे पुरावे संलग्न करणे आवश्यक आहे.

        सन 2023-24 या सत्रात इयत्ता 12 वीची परीक्षा दिलेल्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सीईटी, जेईई, नीट यासारख्या प्रवेश पात्रता परीक्षेत सहभागी झालेल्या परीक्षेचे प्रवेशपत्र अथवा निकालपत्र यासह प्रस्ताव दाखल करावा. तसेच इयत्ता 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी पुर्वी जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव समिती कार्यालयात दाखल केले होते, त्यांनी विहीत वेळेत त्रुटी पुर्तता न केल्याने त्यांचे प्रस्ताव नस्तीबध्द करण्यात आल्याचे संबंधित अर्जदारांना कळविण्यात आले आहे. त्यापैकी जे मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमात वरील नमूद केलेल्या प्रवेश प्रक्रिया परीक्षेस बसलेले आहेत त्यांनी त्यांचे प्रवेश पत्रासह नव्याने अर्ज मागील प्रस्तावातील त्रुटी पुर्ततेसह समिती कार्यालयात दाखल करावे. असे उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी कळविले आहे.

0000000