पटेलांच्या ‘खास‘ग्रामला निधीची गरज

0
18

केंद्राच्या यादीतील विभागांकडे प्रस्ताव पडून : गावाचा विकास रखडण्याची शक्यता

गोंदिया,दि.१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना त्यांच्या मतदार संघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासासाठी ‘खासदार दत्तक ग्रामङ्क ही संकल्पना अमंलात आणली. प्रत्येक खासदारांनी याकरिता प्रयत्न सुरू केले.गोंदिया भंडारा जिल्ह्याचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील पाथरी हे गाव दत्तक घेतले. गावात अनेक कामे आत्तापर्यंत करण्यात आली. वर्षभरात गावाचा कायापालट करून गाव सर्वतोपरी आदर्श करण्याचा खासदार प्रफुल्ल पटेल यांचा प्रयत्न आहे.परंतु त्याकरिता त्यांनी निधीकरिता शासनाच्या विविध विभागाकडे कामांचे प्रस्ताव पाठविले. पाठपुरावा केला. परंतु, अद्याप एकाही विभागाने निधी दिला नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या संकल्पनेतील गावाचा विकास शासकीय यंत्रणेमुळेच रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदारांनी दत्तक घेतलेली गावे स्वयंपूर्ण आणि इतर गावांकरिता आदर्श ठरावीत, असा उद्देश या योजनेचा आहे. त्याकरिता लागणारा निधी कोणत्या विभागांकडून प्राप्त होईल, याची नियमावली, यादी केंद्र सरकारने तयार करून दिली आहे.त्या -त्या विभागांकडे पाथरी या गावातील विकासकामांकरिता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयाने पत्रव्यवहार केला. सातत्याने सहा महिन्यांपासून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, एकाही विभागाने कवडीचाही निधी दिला नाही. जिल्हा नियोजन समितीकडून देखील निधी घेण्यात यावा, असाही उल्लेख केंद्राने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत आहे. त्याकरिता जिल्हा नियोजन समितीकडे निधीचे प्रस्ताव देण्यात आले. मात्र, जिल्हा नियोजन समितीने देखील त्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केले. अशा अवस्थेत खासदारांनी गावाचा विकास करावा तरी कसा? असा प्रश्न खासदारांसमोर उभा ठाकला.
पाथरी येथे आत्तापर्यंत विविध कामे करण्यात आली. त्याकरिता खासदार निधीशिवाय इतर खासदार ,आमदारांच्या निधीसोबतच सीएसआर निधीची मदत घेण्यात आली. पाथरी येथील नागरिकांत आदर्श गावाला घेऊन अपेक्षा उंचावल्या. मात्र, निधीच मिळणार नसेल, तर गावकèयांच्या आकांक्षांवर पाणी फेरले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील खासदार दत्तक ग्राम योजना अध्र्यातच गुंडाळली जाणार की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून असहाकार्य-आमदार जैन
खासदार प्रफुल पटेल यांच्या खासदार दत्तक ग्रामच्या विकासाची धुरा सांभाळणारे आमदार राजेंद्र जैन यांना यांसदर्भात विचारणा करण्यात आली असता त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव तयार करण्यासाठी केंद्राने दिलेल्या एकाही सूचनाचे पालन केले जात नसल्याचे सांगितले.आपण गेल्या सहा -सात महिन्यापासून विविध विभागाकडे तसेच जिल्हानियोजन विभागाकडे विकासकामाचे प्रस्ताव देऊनही निधी देण्यास जिल्हाप्रशासन अपयशी ठरले हे खरे असल्याचे सांगितले.

आम्ही सर्व एजंसीला निर्देश दिले-डिपीओ बकुल घाटे
या संदर्भात जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,आम्हाला असलेल्या निर्देशाप्रमाणे दत्तक ग्रामच्या विकासासाठी ज्या काही विभागाकडून(एंजसी)विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो.अशा सर्वच विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.कुठलेही कामांचे प्रस्ताव रखडलेले नाहीत.