आपत्ती निवारणासाठी दक्षता व जनजागृती महत्वाची शस्त्रे- जिल्हाधिकारी नयना गुंडे

0
24
वाढदिवसाच्या शुभेच्छा

13 ऑक्टोबर जागतिक आपत्ती निवारण दिनानिमित्त रंगीत तालिमेचे आयोजन

गोंदिया दि.13 : आपत्ती सांगून येत नाही, आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी आपत्तीचे पुर्व नियोजन करणे महत्त्वाचे आहे. आपत्तीची तीव्रता कमी करून जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी दक्षता व जनजागृती हे आपत्ती व्यवस्थापनामधील दोन बाजू आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आज दि.13 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अग्नी सुरक्षा रंगीत तालीम या कार्यक्रमात केले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी लीना फलके, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीराम पाचखेडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, फायर स्टेशन इन्चार्ज छबिलाल पटले प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, आपत्ती काळात जनजागृती व दक्षता या दोन्ही शस्त्रांचा वापर करुन कोणत्याही नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीवर मात करणे शक्य आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आपल्या कार्यरत यंत्रणेची रंगीत तालीमेद्वारे तपासणी करणे गरजेचे आहे. दरवर्षी अनेक दुर्दैवी घटना माहितीच्या अभावी घडत असतात, अश्या घटनेत नागरिकांच्या जीवाला धोका देखील असतो, असे त्या बोलत होत्या.

अग्नि सुरक्षा रंगीत तालीम कार्यक्रमात नगरपरिषद गोंदिया येथील अग्निशमन विभागाच्या चमूने आगीवर नियंत्रण करून जखमी व्यक्तींचा बचाव कसा करावा? याबाबत प्रात्यक्षिक दाखविले. तसेच अग्निशमन यंत्राचा वापर करून आगीवर नियंत्रण कसे करावे? याबद्दल मार्गदर्शन करून अग्निशमन यंत्राचे प्रकार व सदर यंत्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखवून अग्नि सुरक्षा व बचाव या विषयावर फायर स्टेशन इन्चार्ज पटले व त्यांच्या चमूने उपस्थितांचे मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी गुंडे यांनी पुढे सांगितले की, आपत्तीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया येथील अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता घेऊन कामाचे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील पूर प्रवण गावे, शाळा, महाविद्यालय, गर्दीचे ठिकाण, पर्यटन स्थळे इत्यादी ठिकाणी रंगीत तालिम व प्रशिक्षणाचे आयोजन करून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करावी. गावातील नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृतीची माहिती कमी प्रमाणात असल्यामुळे आपत्ती काळात नुकसानीचे प्रमाण वाढतात. याकरिता विद्यार्थी प्रवर्गाला प्रशिक्षण देऊन जनजागृती केल्यास त्याचे प्रतिसाद समाजापुढे येतील व पुर परिस्थीतीत जिवीत व वित्तीय हानिचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या.

सदर रंगीत तालीम कार्यक्रमात अप्पर कोषागार अधिकारी एल.एच. बाविस्कर, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी शलाका सूर्यवंशी, पूजा पाटील, लेखाधिकारी अनिता कोनाळे, नायब तहसीलदार एन. ए. बिटले, संजय धार्मिक, सहा. सूचना व विज्ञान अधिकारी जयंत बोराडे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हरिचंद्र पौनिकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन शोध-बचाव दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.