अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्याची सुविधा

0
9

7 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याची मुदत

वाशिम, दि. 04 :  अमरावती पदवीधर मतदार संघाच्या विधान परिषद सदस्य निवडणुकीच्या अनुषंगाने पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करण्यात येत असतात. पात्र पदवीधरांनी ७ नोव्हेंबरपर्यंत विहीत नमुना क्रमांक १८ पदनिर्देशीत अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रासह सादर करावा. मतदार नोंदणीसाठी प्रथमच नमुना क्रमांक १८ अर्जात आधार क्रमांकासाठी रकाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. मतदार नोंदणीची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे. मतदार नोंदणीसाठी पात्रता म्हणून पदवीधर हा भारतीय नागरीक असावा. मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावा. १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान ३ वर्षे आधी त्याने देशातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त केलेली असावी.

           पदवीधर मतदार यादीमध्ये नोंदणीकरीता मतदारांना नमुना क्रमांक १८ अर्ज इंग्रजी किंवा मराठीमध्ये सादर करता येईल. मतदार नोंदणीबाबतचा अर्ज तहसिल कार्यालयामध्ये तसेच मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबंधीत शैक्षणिक पात्रता दर्शविणारा पुरावा/कागदपत्रे पदनिर्देशीत अधिकारी/सहायक पदनिर्देशीत अधिकारी/ संबधीत जिल्हयातील राजपत्रित अधिकारी /नोटरी पब्लिक यांच्याकडुन प्रमाणीत केलेली असणे आवश्यक आहे. एकत्रित स्वरूपातील अर्ज प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे स्विकारण्यात येणार नाहीत. संस्था प्रमुख त्यांच्या संस्थेतील पात्र पदवीधर कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रितरित्या सादर करू शकतात.

          मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पदवीधर मतदारसंघासाठीचा नमुना क्रमांक-१८ ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/ यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळाची लिंक जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जासोबत अपलोड करण्यात आलेल्या रहिवासीचा पुरावा स्वयंसाक्षांकित असणे आवश्यक आहे. अर्जासोबत जोडलेले शैक्षणिक अर्हतेबाबतचे कागदपत्रे उदा. पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका इत्यादि संबंधित पदनिर्देशित अधिकारी/सहायक पदनिर्देशित अधिकारी/जिल्हयातील राजपत्रीत अधिकारी/नोटरी यांच्याकडून प्रमाणित करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपलोड करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची/कागदपत्रांची पडताळणी त्याबाबतच्या मुळ प्रमाणपत्र/कागदपत्रासोबत करून घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत क्षेत्रीय भेटीद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे. जेथे वरील कार्यपध्दती अनुसरण्यात आलेली नाही असा कोणताही अर्ज अपुर्ण समजून मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून तात्काळ नाकारण्यात येईल. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र पदवीधर व्यक्तींनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन नोंदणी 7 नोव्हेंबरपर्यंत करावी. असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन चव्हाण यांनी केले आहे.