34.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ नागपुरात सुरक्षा आढावा: दुसरीकडे विधानभवनताच भेदली सुरक्षा

नागपुरात सुरक्षा आढावा: दुसरीकडे विधानभवनताच भेदली सुरक्षा

0
31

– आवारात विनाक्रमांकाची कारने खळबळ

नागपूर : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी विधानभवन सभागृहात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. यात सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने चर्चिला गेला. असे असताना सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील विधानभवनात नंबर प्लेट नसलेली शासकीय कार आल्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१९ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे. यानिमित्त सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. नागपूर शहरात बंदोबस्तासाठी राज्यातून दहा हजार पोलीस येणार आहे. विधानभवन परिसरात बारकोड प्रवेशपत्र राहणार आहे. सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या वाहनांनाही परिसरात बंदी करण्यात आली आहे. सर्व मंत्री प्रवेशद्वारापासून आतमध्ये पायी चालत येणार आहे. असे असताना विना नंबर प्लेटची कार चक्क अध्यक्ष आणि उपसभापतींनी घेतलेल्या आढावा बैठकीवेळी परिसरात आल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. या संदर्भात नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र भुयार यांच्याशी संपर्क साधला असता नंबर प्लेट वा रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्याशिवाय कोणतेही वाहन सार्वजनिक ठिकाणी वापरता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

विनानंबर प्लेटच्या गाड्या वापरता येत नाही विधानभवनाचा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे आणि असतो. अतिशय संवेदनशील असल्यामुळे अधिकृत आरटीओची नंबर प्लेट नसलेले कोणतेही वाहन परिसरात प्रवेश करू शकत नाही. अशा विना नंबर प्लेटच्या गाड्या विधानभवन परिसरात प्रवेश करणे धोकादायक ठरू शकते. तिथे विधानभवन सुरक्षा यंत्रणेच्या लक्षात ही बाब कशी आली नाही ? हे कळायला मार्ग नाही, असे मत विधिमंडळ सचिवालय माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी नोंदविले.