जातपडताळणी आढावा
गोंदिया, दि. 18 : जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेली प्रकरणं प्राधान्याने निकाली काढण्याच्या सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य निवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आज जात प्रमाणपत्र, जात पडताळणी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष महेश आव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, सदस्य राजेश पांडे, सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी विकास राचेलवार यावेळी उपस्थित होते.
जात पडताळणी समितीने निर्णय घेतलेल्या प्रकरणातील अपात्र प्रकरणांचा कारणासह अहवाल समितीला सादर करावा असे त्यांनी सांगितले. यासोबतच न्यायालयीन प्रकरणांची माहिती सुद्धा सादर करण्यात यावी असे ते म्हणाले.
जिल्हा जात पडताळणी समितीने माहे नोव्हेंबर 2022 अखेर शैक्षणिक कामासाठीची 1243, सेवांतर्गत 14, निवडणूक कार्यासाठीची 16 असे एकूण 1273 प्रकरण निकाली काढली आहेत. उपायुक्त राजेश पांडे यांनी मागील तीन वर्षात सर्व प्रवर्गातील निकाली काढलेल्या प्रकरणांचा अहवाल बैठकीत सादर केला. सन 2019-20 मध्ये 4 हजार 667, सन 2020-21 मध्ये 3 हजार 795, सन 2021-22 मध्ये 5 हजार 322 व एप्रिल 2022 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत 2 हजार 442 प्रकरण समितीने निकाली काढली आहेत.
निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणामध्ये इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील जात पडताळणी प्रस्तावांचा समावेश आहे. शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर कारणास्तव ही पडताळणी करण्यात आली आहे. उपायुक्त राजेश पांडे, सहायक आयुक्त विनोद मोहतुरे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय गणवीर यांनी यावेळी सादरीकरण केले.
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार, सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षण भत्ता, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व शिक्षण फी परीक्षा फी प्रदान या विषयाचा आढावा बैठकीत घेण्यात आला.