राष्ट्रीय आपत्ती दलाचे कार्य कौतुकास्पद- षण्मुगराजन एस.

0
14

एकदिवशीय आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण

 वाशिम, दि. 25 : जिल्हयात गेल्या चार दिवसापासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्हयात आपत्तीविषयक जनजागृती होत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.

         जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे यांच्या संयुक्त वतीने आज २5 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन समिती सभागृहात एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. षण्मुगराजन बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षक पोलीस निरीक्षक राजेश यावले, हेड कॉन्सटेबल विकास राऊत व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.

         या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये पूर, भूकंप, आग, त्सुनामी, सर्पदंश, डॉग स्कॉड, ह्दयविकार व पाण्यात बुडालेल्या व्यक्तींचे प्राथमिक उपचार कशा पध्दतीने करावे याविषयी प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाचे दिपक सदाफळे, दिलीप मेसरे, संजीव कव्हर, अमोल मापारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आपत्ती निवारणाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची पाहणी करुन याबाबत माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.