सामाजिक न्याय पर्व युवा गटाची कार्यशाळा उत्साहात

0
11

वाशिम, दि. 02  : 1 डिसेंबर रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, वाशिम यांच्या संयुक्त वतीने सामाजिक समता पर्वानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हास्तरावर युवा गटांची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

        अध्यक्षस्थानी जिल्हा कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज होत्या. कार्यशाळेचे उदघाटन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी.राऊत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.खंबायत, प्रकल्प अधिकारी श्री. रोकडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे यांची उपस्थिती होती.

        श्री. वाठ यांनी सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर युवा गटाच्या कार्यशाळेबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमुळे युवकांना उद्योग करण्याची दिशा मिळेल असे ते  म्हणाले.

        श्री. गव्हाळे यांनी जिल्हास्तरावर युवा गटाच्या कार्यशाळेची रुपरेषा विशद केली. सामाजिक न्याय पर्वामध्ये युवा गटांना प्रशिक्षण दिल्याचे सांगितले. जिल्ह्यामध्ये 178 युवागट स्थापन करुन त्यांना प्रशिक्षणासोबत रोजगार उपलब्ध करुन दिला. गावाचा विकास करायचा असेल तर युवा गटाची स्थापना करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

          श्री. खंबाईत यांनी व्यवसाय करुन स्वत:च्या कुटूंबाची आर्थिक उन्नती करावी तसेच पंतप्रधान/ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजनेचा लाभ घेवून उद्योग करण्यास सांगितले. देशातील बाजार पेठेचा चिकीत्सक पद्धतीने अभ्यास करुन उद्योग सुरु करावा असेही त्यांनी सांगितले.

         श्री. रोकडे यांनी जिल्हा उद्योग विकास केंद्राद्वारे जिल्हामध्ये 60 लाभार्थ्यांना प्रशिक्षण देवून 45 लोकांना कर्जाचे वाटप केले. त्यापैकी 18 लाभार्थ्यांचे उद्योग सुरु असल्याचे सांगितले.

           श्रीमती बजाज यांनी विद्यार्थी कसा असावा,जीवनामध्ये विद्यार्थ्यांप्रमाणे प्रत्येक गोष्टी शिकण्याची इच्छा आपण सर्वांनी ठेवली पाहिजे, आपले लक्ष ध्येयावर नेहमी केंद्रीत असले पाहिजे, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश आत्मनिर्भर बनविण्यासाठी उद्योजक होवून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यास सांगितले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेवून आपला व्यवसाय कसा उभारता येईल याचा संपूर्ण अभ्यास करावा. त्यासाठी प्रत्यक्ष उद्योगांना भेटी दयाव्यात. त्यामधील बारकावे तपासून पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.

          या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण दिलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रशिक्षणार्थी चंद्रमणी सरकटे यांनी आपल्या प्रशिक्षणामुळे उद्योजक कसे बनावे तसेच व्यवसाय कसा करावा हे शिकवले.

      कार्यक्रमाला मिटकॉन समन्वयक श्री.भगत, संजय निमन, श्याम मोरे, आर.टी.चव्हाण, पी.ए. गवळी, तालुका समन्वयक गोपाल करंगे, वाशिम जिल्हयातील विविध युवा गटातील प्रतिनिधी व विद्यार्थी, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, व्यवस्थापक अनिल गायकवाड व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे संचालन युवराज राठोड यांनी केले. आभार समतादूत श्रीमती प्रणिता दसरे यांनी मानले.