
गोंदिया-माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी गोंदियातील आशा सेविका व आरोग्य सेविकाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.14 डिसेंबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल गोंदिया जिल्हयातील डव्वा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका श्रीमती गीता चोपराम भेंडारकर व आरोग्य सेविका श्रीमती पंचफुला राने यांना देण्यात आला.देशातील महाराष्ट्र व राज्यातुन गोंदिया जिल्ह्यातील कर्मचार्यांना पुरस्कार प्राप्त झाल्याने जिल्ह्याची मान ताठ झाली आहे.जिल्ह्यात सुद्धा त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनीही दोन्ही कर्मचार्यांचे यानिमित्ताने विशेष अभिनंदन केले आहे. आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन आंबाडेकर , सहसांचलक डॉ.भोये यांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले आहे.
सामाजिक विकास ध्येय साध्य करण्यासाठी आणि देशातील माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी माता आरोग्य केंद्रात नाविन्यपूर्ण योजनांची देवाणघेवाण, विचार विनिमयासाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मातृत्व आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माता मृत्यू कमी करण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या या कार्यशाळेची मुख्य संकल्पना ‘टाळता येण्याजोग्ये माता मृत्यू शून्य करण्यासाठी प्रयत्न’ अशी होती.
माता आरोग्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय प्रयत्न आणि कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही कर्मचार्यांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहे. देशामध्ये माता मृत्यूच्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानावर आहे तर पहिल्या स्थानावर केरळ राज्य आहे. दोन्ही कर्मचार्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आरोग्य विभागाचे जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, मातृत्व अनुदान योजना, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादी योजना प्रभावीपणे राबवल्या तसेच सुरक्षित मातृत्वासाठी विविध उपाय योजना राबवल्यामुळे त्यांना पुरस्क्रुत केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.