मनपाची बेघरांसाठी शोधमोहीम बेघर निवाऱ्यात करण्यात येते व्यवस्था

0
5

चंद्रपूर १७ डिसेंबर – उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास १५ महिला पुरुष बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली.
अनेकदा परिस्थितीने गांजलेल्या व्यक्तीला कुणाचाही आधार न मिळाल्याने भटकत, उघड्यावर जगावं लागते. उड्डाण पूलाखाली, रस्त्याकडेला, मोकळया जागेवर बेघर आपणास दृष्टीस पडतात. त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेने निराधार-बेघरांना मदतीचा हात दिला आहे. मनपाच्या निवारा चमूने शुक्रवारी १६ डिसेंबरच्या रात्री विशेष मोहीम राबवित १५ बेघरांना जवळच्या निवारा केंद्रात आश्रय दिला आहे.
चंद्रपूर शहरातील फुटपाथ, रस्त्याच्या शेजारी पूलाखाली व अन्य ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या बेघरांसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी बेघर निवारा केंद्र सुरू केलेले आहेत. त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या बेघर निवारा चमूद्वारे विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागातून रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शोधून त्यांना मनपाच्या बेघर निवारा केंद्रांमध्ये नेण्यात येत आहे. त्यानुसार एकूण १५ व्यक्तींना मनपाच्या वाहन व्यवस्थेच्या मदतीने निवारा केंद्रात नेवून आश्रय दिला. उपायुक्त अशोक गराटे आणि सहायक आयुक्त सचिन माकोडे यांच्या नेतृत्वात  NULM विभाग प्रमुख रफिक शेख,शहर अभियान व्यवस्थापक रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम, समुदाय संघटक सुषमा करमनकर ,खडसे, मून, लोणारे, पाटील व समाज कल्याण विभागाचे कर्मचारी काम करीत आहे.