देश मजबूत करायचं असेल तर गाव विकास महत्त्वाचा : भास्कर पेरे पाटील

0
27

नवनिर्वाचित सरपंच सदस्यांचा सत्कार सोहळा उत्साहात.

सडक अर्जुनी: गावाचा विकास घडवून आणण्यासाठी सरपंचाची भूमिका महत्त्वाची असते ते समजून घेणे आवश्यक आहे.प्रत्येकाने आपल्या गावाला घडविण्यासाठी प्रयत्नरत असणे आवश्यक आहे.शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनेच्या मागे न पडता आपल्या गावासाठी चांगलं काय करता येईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.गावविकास हा महत्त्वाचा कणा मानला पाहिजे,गावाचा विकास करण्यात जर आपल्याला यश आले तर देश मजबूत करायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले.

सडक अर्जुनी येथे काल ०५ जानेवारी रोजी आशीर्वाद सभागृह सडक अर्जुनी येथे इंजि.राजकुमार बडोले मित्रपरिवार तर्फे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच,सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंन्ढे यांच्या हस्ते करण्यात आले,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर होते,प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर,प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे,जिल्हा संघटनमंत्री संजय कुलकर्णी,जिल्हा परिषद गटनेते लायकराम भेंडारकर,सडक अर्जुनी पंचायत समिती सभापती संगीता खोब्रागडे,गोरेगाव पंचायत समिती सभापती मनोज बोपचे तालुकाध्यक्ष अशोक लंजे,विजय कापगते,साहेबलाल कटरे विधानसभा क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यत तथा ज्येष्ठ पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार सुनील मेंढे यांनी मनरेगा योजनेच्या माध्यमातून केले जाणाऱ्या कामाची माहिती देऊन प्रत्येकानी सदर योजनेच्या माध्यमातून आपल्या गावातील मजुरांच्या हाताला काम कसे मिळेल याकडे लक्ष केंद्रित करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री इंजि राजकुमार बडोले यांनी केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतीना मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असून त्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधून संधीचे सोने करावे असे आवाहन केले.

याप्रसंगी मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील ९९ पैकी ७५ सरपंच व जवळपास ६०० हून अधिक सदस्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले तर संचालन सडक अर्जुनी पंचायत समितीचे उपसभापती शालिंदर कापगते व पंचायत समिती सदस्य निशा काशिवार यांनी केले.आभार लक्ष्मीकांत धानगाये यांनी मानले.