
गोंदिया,दि.16ः “बेटी बचाओ – बेटी पढाओ” हा उपक्रम जिल्ह्यात महिला बालकविकास विभाग,ग्रामपंचायत,शिक्षण विभाग व आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रशासनाने काटेकोरपणे राबवावे असे निर्देश जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिले.भारत सरकारच्या महिला बालविकास विभागाच्यावतीने सदर उपक्रम राबविण्यासंबधीचे निर्देश जिल्हाप्रशासनाला प्राप्त झाले,त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सुचना दिल्या आहेत.18 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत पाच दिवस विविध उपक्रम राबवून 24 जानेवारीला “राष्ट्रीय बालिका दिन” साजरा करावे असेही शासनाने म्हटले आहे.या कार्यक्रमांमध्ये लिंग आधारित लिंग निवड निर्मूलन करणे, मुलींचे अस्तित्व आणि संरक्षण करणे आणि मुलींसाठी सुधारित शैक्षणिक परिणाम सक्षम करणे याबाबत कार्यक्रम आयोजित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.