शिक्षक मतदार संघासाठी गोंदियात १० मतदान केंद्रावर होणार मतदान

0
30

एकूण मतदार ३८८१स्त्री मतदार १२१८ तर पुरुष मतदार २६६३
३० जानेवारी २०२३ रोजी मतदान
मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत

 गोंदिया,दि.18 :  विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार असून गोंदिया जिल्ह्यात एकूण १० मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. या निवडणुकीत ३८८१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात स्त्री मतदार १२१८ तर पुरुष मतदार २६६३ आहेत. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत असणार आहे.

       मतदान केंद्राची माहिती

          तहसील कार्यालय रुम नंबर ०१ तिरोडा ४८९ मतदार, जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रूम नंबर ०४ दवणीवाडा ता. गोंदिया २४५ मतदार, बैठक सभागृह अपर तहसीलदार कार्यालय प्रशासकीय इमारत जयस्तंभ चौक गोंदिया ११९९ मतदार, तहसील कार्यालय रूम नंबर ०१ आमगाव ३७३ मतदार, तहसील कार्यालय रूम नंबर ०१ सलेकसा १४२ मतदार, तहसील कार्यालय रूम नंबर ०१ गोरेगाव २८५ मतदार, तहसील कार्यालय रूम नंबर ०१ सडक अर्जुनी २४६ मतदार, तहसील कार्यालय रूम नंबर ०१ देवरी ३६६ मतदार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूम नंबर ०२ बालाजी मंदिर जवळ नवेगावबांध तालुका अर्जुनी मोरगाव २११ मतदार व तहसील कार्यालय रूम नंबर ०१ अर्जुनी मोरगाव ३२५ अशी मतदान केंद्र व मतदारांची आकडेवारी आहे.

        मत कसे नोंदवाल… निवडणूक आयोगाच्या सूचना

           शिक्षक मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करताना पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान पद्धतीबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मतदारांनी मतदानाचे कार्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.

          मतदान करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतदान करताना केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केचपेननेच मत नोंदवावे. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपेनचा वापर करण्यात येऊ नये. आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘१’ हा अंक लिहून मत नोंदवावे.  निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता. पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात २, ३, ४ इत्यादीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवता येतील. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा. तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.

           पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत

           पसंतीक्रम हे केवळ १, २, ३ इत्यादी अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदवू नयेत. पसंतीक्रम नोंदविताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात I, II, III किंवा मराठी भाषेतील देवनागरी १,२,३ या स्वरूपात नोंदवावे.