वाशिम जिल्हा अव्वल मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान

0
10

6 लक्ष 73 हजार मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडले

 वाशिम, दि. 24  : वर्षभरात जिल्हयात मतदार नोंदणी प्रक्रीया आणि मतदार जनजागृती अभियानात वाशिम जिल्हयाने राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याने वाशिम जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनी मुंबई येथील चर्चगेट जवळील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापिठाच्या पाटकर सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन व कारंजाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी धीरज मांजरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हयासोबतच हिंगोली, ठाणे, नागपूर, अहमदनगर व पुणे जिल्हाधिकारी यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे.

         जिल्हयात जास्तीत जास्त मतदार जनजागृती आणि मतदार नोंदणी व्हावी, यासाठी 147 निवडणूक व्यासपिठांची, 93 मतदार जागृती मंचाची आणि 1052 चुनाव पाठशालांची स्थापना करण्यात आली. या व्यासपिठाअंतर्गत शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा व पथनाटय कार्यक्रमाचे आयोजन करुन युवा मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. मतदार यादी 5 जानेवारी 2023 रोजी अदयावत करण्यात आली आहे. जिल्हयात मतदार यादी अद्यावत केल्यानुसार 5 लक्ष 1 हजार 919 पुरुष, 4 लक्ष 52 हजार 193 स्त्री आणि 14 तृतियपंथी मतदार अशा एकूण 9 लक्ष 54 हजार 126 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हयात एकूण 9 लक्ष 54 हजार 126 मतदारांपैकी 6 लक्ष 73 हजार 241 मतदारांची मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडणी करण्यात आली आहे. या जोडणीचे प्रमाण 70.56 टक्के इतके आहे. राज्यामध्ये सर्वप्रथम 70 टक्केपेक्षा जास्त आधारकार्डशी मतदार कार्डसोबत जोडण्यात वाशिम जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

         एकसारखे फोटो असलेले जिल्हयात 32 हजार 784 मतदारांची संख्या होती. त्याबाबत सर्व मतदारसंघाचा सातत्याने पाठपुरावा करुन वगळणी व मतदारांचे छायाचित्र अपलोड करण्यात आले. सन 2023 या वर्षाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीनंतर नव्याने 20 हजार 248 प्राप्त झाले. त्यांचे चेकलिस्ट डाऊनलोड करुन त्यावर बीएलओमार्फत गरुडा ॲपच्या मदतीने योग्य ती पडताळणीची कार्यवाही करण्याचे काम सुरु आहे.

         जिल्हयात फोटो नसलेल्या मतदारांची संख्या एकूण 21 हजार 100 होती. त्याबाबत सर्व मतदारसंघाचा सातत्याने पाठपुरावा करुन 19 हजार 577 मतदारांची वगळणी करण्यात आली. तर 1 हजार 523 मतदारांचे छायाचित्र इरोनेटव्दारे अपलोड करण्यात आले आहे. अमरावती विभागामध्ये सर्वप्रथम कारंजा विधानसभा मतदारसंघात फोटो नसलेल्या मतदारांची पडताळणीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

         वंचित घटकाकरीता काम करणाऱ्या संस्था यांच्या विशेष सभा घेऊन त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अधिकारी/ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासोबत वारंवार सभा घेऊन मतदार नोंदणी करण्याबाबत प्रभावीपणे प्रचार प्रसिध्दी करण्यात आली. जिल्हयात जास्तीत जास्त मतदार नोंदणी व मतदार जनजागृती करण्याबाबत समाज माध्यमांचा वापर करण्यात आला. शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्हयात तीनही विधानसभा मतदारसंघात ऑनलाईन 7 हजार 791 दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.