ई-पिक पाहणी न झालेले शेतकरी विकू शकतील धान

0
49

* 31 जानेवारी पर्यंत धान खरेदी केंद्रावर नोंद करावी

* प्रमाणित याद्या खरेदी केंद्रावर उपलब्ध

* एनईएमएल पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी

   गोंदिया दि. 25: ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी न झाल्याने धान खरेदी केंद्रावर नोंद झाली नाही, त्यांनी 31 जानेवारी पर्यंत धान खरेदी केंद्रावर जाऊन खरेदीसाठी नोंद करून घ्यावी. ई पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तहसीलदार यांनी प्रमाणित करून धान खरेदी केंद्रावर पाठवल्या आहेत. त्या आधारे शेतकऱ्यांनी 31 जानेवारी 2023 पर्यंत एनईएमएल पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.

विविध कारणांमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांची ई-पीकपाहणी न झाल्यामुळे पिकपेऱ्याची खसऱ्यावर नोंद न झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकृत धान खरेदी केंद्रांवर धान विक्री करता येत नसल्याचा मुद्दादेखील लोकप्रतिनिधींद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्यानुसार हा मुद्दा अन्न, नागरी पुरवठाविभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर विभागाने नोंदणी करण्याची तारीख 31 जानेवारी, 2023 पर्यंत वाढवून दिलेली आहे.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदारांना निर्देश देण्यात आले होते, व त्यानुसार तहसीलदारांनी तलाठ्यांकरवी ई-पीकपाहणी होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांची तपासणी करुन अश्या शेतकऱ्यांची प्रमाणित यादी बनवण्यात आली. सदर अधिकृत यादी आता सर्व संबंधित खरेदी केंद्रांवर पाठवण्यात आली आहे.

ज्यांचा ई-पीकपाहणी नुसार खसऱ्यावर पिकपेरा झाला नव्हता, त्यांनी नजिकच्या अधिकृत धान केंद्रावर जाऊन आपले नाव यादीनिहाय असल्यास आपले रजिस्ट्रेशन व धान विक्री 31 जानेवारीपर्यंत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.

ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी न झाल्याने धान खरेदी केंद्रावर नोंद झाली नाहीं, त्यांनी 31 जानेवारी पर्यंत धान खरेदी केंद्रावर जाऊन खरेदीसाठी नोंद करून घ्यावी. ई पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तहसीलदार ह्यांनी प्रमाणित करून खरेदी केंद्रा वर पाठवल्या आहे. त्या आधारे एनईएमएल पोर्टलवर नोंदणी 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करावी.