नागपूर – हावडा मार्गावर ८० तासांचा ‘मेगा ब्लॉक’

0
37

नागपूर : तिसऱ्या रेल्वेमार्गाचे (थर्ड लाईन) काम जलद गतीने करण्यासाठी नागपूर ते हावडा या महत्त्वाच्या आणि व्यस्त रेल्वेमार्गावर पुढील ८० तास ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. यामुळे शिवनाथ एक्सप्रेस, कामाख्या एक्सप्रेस आणि इतर पाच गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर २० मिनिटे ते अडीच तास थांबवून ठेवण्यात येतील.

नागपूर विभागातील चाचेर स्थानकावर तिसरा मार्ग टाकण्यात येत आहे. त्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२३ (म्हणजे ८० तासात) केले जाईल. यामध्ये कोणतीही प्रवासी गाडी रद्द करण्यात आलेली नाही किंवा इतर मार्गाने वळवली जाणार नाही. मात्र, काही गाड्यांना २० मिनिटे ते अडीच तास काही स्थानकावर थांबवून ठेवण्यात येणार आहे.टाटानगर-इतवारी एक्सप्रेसला गोंदिया व भंडारा येथे अडीच तास थांबवण्यात येईल. कोरबा-इतवारी एक्सप्रेसला गोंदिया व भंडारा येथे अडीच तास, निजामुद्दीन-विशाखापट्टणम एक्सप्रेसला नागपूर आणि कामठी येथे पावणेदोन तास थांबवण्यात येईल. कुर्ला-कामाख्या एक्सप्रेसला नागपूर व कामठी येथे ४५ मिनिटे थांबवण्यात येईल. इंदूर-पुरी हमसफर एक्सप्रेस नागपूर व कामठी येथे ४० मिनिटे आणि इतवारी-बिलासपूर शिवनाथ एक्सप्रेस इतवारी येथून अडीच तास विलंबाने धावणार आहे.