रानडुकराचा शाळेत सात तास धुडगूस

0
30

तुमसर –जंगलातून भटकलेले एक रानडुकर थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत शिरल्याची घटना तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे घडली. तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर या रानडुकराला वनविभागाने जेरबंद केले. रानडुकराला पाहण्यासाठी शाळेसमोर मोठी गर्दी झाली होती.
चुल्हाड येथील जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी मंडप उभारणीचे काम सुरू होते. दरम्यान गुरुवारी सकाळी ७ वाजता मोठे रानडुकर थेट शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरले. सुदैवाने यावेळी शाळेचे विद्यार्थी नव्हते. रानडुकर शाळेत शिरल्याची माहिती होताच गावकर्‍यांनी शाळेकडे धाव घेतली. वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली.
तुमसर वन परिक्षेत्र कार्यालय अधिकारी आणि सिहोरा पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या रानडुकराला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. रानडुकर शाळेत इकडे तिकडे पळत होते. सात तासाच्या प्रयत्नानंतर या रानडुकराला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी छगनलाल रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी डेव्हीड मेर्शाम, काहुलकर, सेलोकर, वासनिक, शेख यांनी केली. रानडुक्कराला वनविभागाने जेरबंद केल्यानंतर रानडुक्कर जखमी असल्याचे लक्षात आले. रानडुकराला जेरबंद केल्यानंतर बपेरा येथील पशू चिकित्सालयात नेऊन उपचार करण्यात आले. त्यानंतर सोड्याटोला जंगलात सोडून देण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही.