जिल्ह्यातील तीन लाख ४५ हजार बालकांची होणार आरोग्य तपासणी – जिल्हाधिकारी

0
14

९ फेब्रुवारी पासून जिल्ह्यात जागरूक पालकसुदृढ बालक‘ अभियान

  • आरोग्य व महारक्तदान शिबिराचेही आयोजन
  • ० ते १८ वयाच्या मुला-मुलींची तपासणी
  • आजारी बालकांवर त्वरित उपचार

          गोंदिया दि. ७  : जिल्ह्यात ०९ फेब्रुवारी पासून पुढील ६० दिवस ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यामधील ० ते १८ वर्षे वयोगटातील ०३ लाख ४५ हजार मुला-मुलींची तपासणी करण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभागाच्या २७२ टीम तयार करण्यात आल्या आहेत. हे तपासणी अभियान पुढील ६० दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा काळात आरोग्य तपासणी तात्पुरती थांबविण्यात येणार आहे. हे अभियान नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात यावे व यातून पात्र लाभार्थी सुटू नये याची काळजी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केल्या.

         अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यावेळी उपस्थित होते.

         राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ९ फेब्रुवारी पासून “जागरूक पालक, सुदृढ बालक” अभियान राबविण्यात येणार असून या अंतर्गत जिल्हाभर आरोग्य व महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

           जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रम शाळा, अंध-दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, बालगृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे, खासगी नर्सरी, बालवाड्या, खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालये तसेच शाळा बाह्य ० ते १८ वर्षापर्यंतच्या मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान आजारी आढळून आलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे.

          जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी ०९ फेब्रुवारीला दिवसभर आरोग्य व महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

         ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी करतांना त्यांच्यामधील प्रामुख्याने आढळणारे आजार, व्यंग, जीवनसत्वाची कमतरता तसेच किशोरवयीन समस्यांचा विचार केला जाणार आहे. २० ते २५ प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. या अभियानात आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे व सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहे. या अभियानाचे सादरीकरण अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी केले.