जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते ‘समर्पण’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन

0
24

वाशिम, दि. 08  : समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण निवडक योजनांवर तयार केलेल्या ‘समर्पण’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन आज 8 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी जिल्हधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समाज कल्याण विभागाच्या अधीक्षक कल्पना ईश्वरकर यांच्यासह विविध यंत्रणेचे विभाग प्रमुख उपस्थिती होते.

अनुसूचित जाती उपयोजना सन 2022-23 या वर्षात जिल्हा माहिती कार्यालयाने ‘समर्पण’ ही घडीपुस्तिका तयार केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती व्हावी व त्यामाध्यमातून त्यांनी योजनांचा लाभ घ्यावा. या उद्देशाने ही घडीपुस्तिका तयार केली आहे. या घडीपुस्तिकेमध्ये निवडक महत्वपूर्ण योजनांची माहिती दिली आहे. यामध्ये मार्जिन मनी योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृहे, शेळी गट वाटप, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींसाठी निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आदी योजनांचा समावेश या घडीपुस्तिकेत करण्यात आला आहे. योजनेची थोडक्यात माहिती, प्रमुख अटी व लाभाचे स्वरुप आणि कोणत्या कार्यालयाशी लाभार्थ्यांने संपर्क साधावा हे या घडीपुस्तिकेत नमुद केले आहे.