रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्यचा वापर करा : अनिल पाटील

0
14

‘भारत सरकारच्या विकासाची 8 वर्ष व आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष 2023’

मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचा उपक्रम

गोंदिया, दि.8  : आपली मुळ संस्कृती जपण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्यचा वापर करावा, त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.

        माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर, जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहयोगाने जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीत आयोजित ‘भारत सरकारच्या विकासाची 8 वर्ष व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’ या विषयावरील मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या सहायक संचालक निकीता जोशी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे सहायक संचालक हंसराज राऊत उपस्थित होते.

            सदर प्रदर्शन 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 7 या वेळेत नागरिकांसाठी नि:शुल्क उपलब्ध आहे. या प्रदर्शनात कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, महिला व बाल विकास विभाग आदी विविध विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी उपलब्ध असून जिल्ह्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सदर प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी यावेळी केले.

          पोलिस अधिक्षक निखील पिंगळे म्हणाले की, विदेशी खाद्य संस्कृतीच्या आक्रमणामुळे आपले  आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आपल्या नागरीकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी भारत सरकार आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’ यावर्षी साजरा करीत आहे. या माध्यमातून सरकारद्वारे आरोग्यासाठी पोषक असलेल्या विविध धान्यांच्या प्रजातींचा प्रचार प्रसार करण्यात येत आहे. जेणेकरून शेतक-यांनी हे पीक आपल्या शेतात घेऊन नागरीकांचे आरोग्य सुदृढ करण्यास मदत होईल, त्यामुळे या मोहिमेला गावागावात पोहचवून सर्वांचे आरोग्य सुदृढ करावे. तसेच गोंदिया जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर निसर्गाची देणगी लाभली आहे. महाबळेश्वर सारख्या थंड हवामानात स्टॉबेरीचे पीक घेतले जाते. ते आज गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील टेकड्यांवर सुध्दा स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या या पिकाबाबत जनजागृती करून असे प्रयोग जिल्ह्यातील शेतक-यांनी करावे. प्रदर्शनात दिलेल्या माहितीचा लाभ घेण्यासाठी नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

           प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्यूरोचे सहायक संचालक हंसराज राऊत यांनी केले. संचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले, तर आभार जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी मानले.