चंद्रपूर मनपात बाल मृत्यू अन्वेषण कार्यशाळा संपन्न

0
9

चंद्रपुर २4 फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत एक दिवसीय बाल मृत्यू अन्वेषण जागरूकता कार्यशाळा मनपा राणी हिराई सभागृहात घेण्यात आली.आरोग्य विभागाअंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,सार्वजनीक आरोग्य परिचारिका यांना प्रशिक्षण देण्यात आले.
बाल मृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. राज्यामध्ये होणाऱ्या अर्भकांच्या व बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याच्या दृष्टीने तसेच भविष्यात होणारे बाल मृत्यू टाळण्यासाठी नियोजन करण्याचे दृष्टीने शासनामार्फत गेल्या काही वर्षांपासुन बालमृत्यूचे अन्वेषण करणे ही योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यात नवजात शिशु मृत्यू, नवजात पश्चात शिशु मृत्यू अर्भक मृत्यू,बाल मृत्यू, उपजत मृत्यू असे बाल मृत्यूचे प्रकार असुन याशिवाय पालक किंवा नातेवाईक यांच्याकडुन निर्णय घेण्यास उशीर होणे, प्रवासादरम्यान झालेला उशीर, संदर्भ सेवा /उपचार देण्यास झालेला उशीर या कारणांनीही बाल मृत्यू संभवतो.बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास आवश्यक त्या उपाययोजना काय कराव्या याचे प्रशिक्षण उपस्थीत ६० आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार,डॉ. अश्विनी भारत, डॉ.अरवा लाहिरी यांच्याद्वारे कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी डॉ. नयना उत्तरवार, डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. योगेश्वरी गाडगे,डॉ. शुभांकर पिदुरकर तसेच शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधु व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.