
गोंदिया, दि.8 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. मानवी आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्यांचा समावेश व त्यांचे मानवी आरोग्यामध्ये असलेले योगदान व महत्व सर्व लोकांना माहित व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन महिलांनी पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील समावेश व त्यांचे महत्व या बाबतची माहिती पत्रके, झेंडे, बॅनर इत्यादी प्राचार साहित्य घेऊन बाईक व ई-रिक्षा द्वारे रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी उपस्थित महिलांना पौष्टिक तृणधान्य आहारातील समावेश व महत्व या बाबत मार्गदर्शन केले व सर्व नागरिकांनी ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, राजगिरा इत्यादी तृणधान्यांचा आपल्या नियमीत आहारात समावेश करावा असे आवाहन केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, नायब तहसिलदार सीमा पटले, जिल्हा युवा अधिकारी श्रृती डोंगरे, समाजसेविका सविता बेदरकर, तंत्र अधिकारी कावेरी साळे व जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक के.के.गजभिये यांनी सदर बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. बाईक रॅलीची नविन प्रशासकीय इमारत येथून सुरुवात होऊन शहरातील मुख्य मार्गावरुन पौष्टिक तृणधान्यांबाबत जनजागृती करीत या महिला परत नविन प्रशासकीय इमारत येथे आल्या व रॅलीचा समारोप झाला. सदर बाईक रॅली व ई-रिक्षा रॅलीमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला व कृषि विभागाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या.