जिल्हाधिकाऱ्यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी 

0
16
वाशिम दि.20– जिल्ह्यात मागील दोन दिवसात आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पाहणी आज 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी प्रत्यक्ष शेतीला भेट देऊन केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर,मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,वाशिम तहसीलदार श्री.मालठाणे,मंगरुळपीरचे प्रभारी तहसीलदार रवी राठोड,वाशिम तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड व मंगरुळपीर तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांची  प्रामुख्याने उपस्थिती होती.
    वाशिम तालुक्यातील कळंबा (महाली) येथील नुकसान झालेल्या शेतीतील पिकाची पाहणी केली. मंगरूळपीर तालुक्यातील झाडगाव येथील गोपाल शिंदे यांच्या कांदा बियाणे पिकाची, दिलावलपूर येथील अनंत ठोंबरे यांच्या शेतातील कांदा, पपई,गहू व लिंबू पिकाच्या नुकसानीची,चहाल येथील शेतकरी सुनील चौधरी यांच्या कोबी,फुलकोबी व टोमॅटो पिकाची व गंगाराम राठोड यांच्या टरबूज पिकाच्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली.
          जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच, नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनास अहवाल पाठविण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून उपस्थित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.
     पीक नुकसानीच्या पाहणी दरम्यान त्यांच्या समवेत वाशिमचे मंडळ कृषी अधिकारी अनिल कंकाळ,श्रीमती आदमाने,कृषी सहाय्यक महादेव सोळंके,तलाठी श्री.महल्ले, व श्री कड यावेळी उपस्थित होते.