जुन्या पेन्शनसाठी गोंदियातील कर्मचाऱ्यांचा संप कायमच,समन्वय समितीच्या निर्णयाला विरोध

0
64

गोंदिया,दि.20 जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय, नियमशासकीय कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारला असून आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे.याच अनुषंगाने गोंदिया तालुक्यातील व जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी आज 20 मार्च रोजी आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलनात सहभागी होत सकाळच्या सुमारास थाळीनाद आंदोलन केले.मात्र आज दुपारला 2 वाजेच्या सुमारास राज्य कर्मचारी महासंघ व राजपत्रीत अधिकारी महासंघासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत संप मागे घेण्याची विनंती केली.यावेळी बैठकीत सहभागी सर्व कर्मचारी संघटनानी मात्र जुनी पेंशन लागू करा या मुद्याला जोर न देता नवीन पेंशन मध्ये जुन्या पेंशनचा काही भाग समाविष्ठ करण्याच्या सरकारच्या भूमिकेला समर्थन देत संप मागे घेण्याची घोषणा केली.त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील कर्मचारी संघटनांनी मंत्रालयात बैठकीला गेलेल्या नेत्यांचा निषेध नोंदवित जोपर्यंत जुनी पेंशन पुर्णत लागू होत नाही,तोपर्यत संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला.गोंदिया येथे रात्री उशीरापर्यंत हे आंदोलन सुरुच होते तसेच समनव्य समितीचे निमंत्रक लिलाधर पाथोडे,राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे आशिष रामेटके,ग्रामसेवक संघटनेचे कमलेश बिसेन,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे पी.जी.शहारे,संतोष तोमर,सुभाष खत्री,एस.यु.वंजारी,रवी अंबुले,तिर्थराज उके,रामा जमईवार आदींनी आम्ही संपात कायम असून गोंदिया जिल्ह्यात संप सुरुच राहील अशी भूमिका असल्याचे सांगितले.