प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन

0
9

 गोंदिया, दि. 26: गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत 25 मार्च 2023 रोजी मोदी मैदान, टी पॉईंट जवळ, बालाघाट रोड,गोंदिया येथे खरेदीदार विक्रेता संमेलन कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.

         जिल्ह्यातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देऊन त्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना भांडवली उद्योग, गुंतवणूक, सामायिक पायाभूत सुविधा, मार्केटिंग व ब्रँडिंग, बीज भांडवल या माध्यमातून व्यावसायिक हितसंबंध निर्माण करून सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांच्या उत्पादनांना विक्रीसाठी नवीन संधी उपलब्ध होणे हा खरेदीदार विक्रेता संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याबाबत कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण यांनी सांगितले. तसेच योजनेअंतर्गत लाभार्थी यांनी खरेदीदार विक्रेता संमेलनाच्या माध्यमातून थेट खरेदीदारांची चर्चा करून आपल्या उत्पादनाची माहिती देऊन विक्री करावी असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी आवाहन केले.

         या संमेलनामध्ये प्रवीण वानखेडे नागपूर युनिव्हर्सल एक्सपोर्ट, सुबोध बडोले महा ऍग्रो एक्सपोर्ट, मनोज अग्रवाल पुरुषोत्तम बाजार गोंदिया, चंदन माणिकपुरी गोंदिया इत्यादी विविध खरेदीदार उपस्थित होते. प्रवीण वानखेडे युनिव्हर्सल एक्सपोर्ट यांनी आयात निर्यात या संदर्भात लाभार्थ्यांना माहिती दिली. माल निर्यात करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया, परवाने व मानके याबाबतही सांगितले.

       भूपेंद्र फुंडे सनदी लेखापाल गोंदिया यांनी योजनेची अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत माहिती दिली तसेच उदय खर्डेनविस व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक यांनी बँकेबद्दल प्रपोजल बनविण्याबाबत व कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेबाबत सविस्तर माहिती सांगितली. तदनंतर उपस्थित खरेदीदार व योजनेचे लाभार्थी यांची चर्चा घडवून आणण्यात आली .

        यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण,  कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, तंत्र अधिकारी कावेरी साळे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी अधिकारी पवन मेश्राम उपस्थित होते .

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा शिवनकर यांनी केले. सदर संमेलनामध्ये जिल्हा संसाधन व्यक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी, महिला आर्थिक विकास महामंडळ यंत्रणे अंतर्गत महिला व शेतकरी बंधू यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.