बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट)प्रकल्प अंतर्गत मोबिलायझेशन व सेन्सिटायझेशन घटकांतर्गत कार्यशाळा

0
8

गोंदिया, दि. 26:  25 मार्च रोजी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)अंतर्गत मोबिलायझेशन व सेंसिटायझेशन घटका अंतर्गत समुदाय आधारित संस्थाकरिता एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट गोंदिया व महिला आर्थिक विकास महामंडळ,गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषी महोत्सव येथील चर्चासत्राच्या दालनात मोदी मैदान, गोंदिया येथे हिंदुराव चव्हाण प्रमुख, जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट तथा प्रकल्प संचालक, आत्मा गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

          सदर कार्यशाळेला उदय खर्डेनाविस, व्यवस्थापक,जिल्हा अग्रणी बँक, गोंदिया, संजय संगेकर,जिल्हा समन्वय अधिकारी, माविम, गोंदिया प्रणाली चव्हाण, नोडल अधिकारी, स्मार्ट, गोंदिया कावेरी साळे, पुरवठा व मूल्य साखळीतज्ञ स्मार्ट, गोंदिया समीर परवेज,सेवानिवृत्त,उपायुक्त मत्स्यव्यवसाय विभाग धनराज तुमडाम,तालुका कृषी अधिकारी गोंदिया, सचिन कुंभार,अर्थ सल्लागार स्मार्ट,गोंदिया भूपेंद्र फुंडे,सनदी लेखापाल, गोंदिया प्रवीण वानखेडे, युनिव्हर्सल एक्सपोर्ट, नागपूर अनुराघ बडोले, महा ऍग्रो एक्सपोर्ट, सौरभ यादव, न्यू इंडिया एक्स्पोर्ट इत्यादी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

        सर्वप्रथम प्रणाली चव्हाण, नोडल अधिकारी,स्मार्ट यांनी सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. तसेच स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत समाविष्ट बाबीविषयी विस्तृत माहिती दिली. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेविषयी माहिती दिली. तदनंतर भूपेंद्र फुंडे, सनदी लेखापाल यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, कंपनीची स्थापनानंतर करावयाचे अनुपालन यामध्ये नियमक अनुपालन व लीगल अनुपालनबाबत माहिती दिली. त्यानंतर उदय खर्डेनाविस, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक यांनी बँकेमार्फत येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या व उपस्थितांना बँकेमार्फत पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल याबाबत कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेविषयी माहिती दिली. यानंतर समीर परवेज, सेवानिवृत्त उपायुक्त मत्स्यव्यवसाय विभाग यांनी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय व अनुषंगिक योजना संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर कावेरी साळे, पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ, स्मार्ट गोंदिया यांनी समुदाय आधारित संस्थांच्या मूल्य साखळी विकास कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रवीण वानखेडे युनिव्हर्सल एक्सपोर्ट नागपूर यांनी समुदाय आधारित संस्थांचे उत्पादन निर्यात करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे निर्यातीची प्रक्रिया याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निर्यातीसाठी मदत व मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगितले.त्यानंतर अनुराघ बडोले, महा ऍग्रो एक्सपोर्ट यांनी निरीक्षण उत्पादने याबाबत माहिती दिली. तसेच निर्यातीसाठी मालाची गुणवत्ता बाबत सौरभ यादव यांनी मार्गदर्शन केले.  यानंतर सचिन कुंभार अर्थ सल्लागार जिल्हा अंमलबजावणी कक्ष,स्मार्ट यांनी उपस्थितांना सविस्तर प्रकल्प आराखडा कसा असावा तसेच समुदाय आधारित संस्थांना प्रकल्प व्यवस्थापनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

         यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदुराव चव्हाण प्रमुख, जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट तथा प्रकल्प संचालक, आत्मा गोंदिया यांनी सर्व समुदाय आधारित संस्थांनी विविध विभागाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा जेणेकरून उत्पादित मालाला योग्य भाव मिळून आर्थिक प्रगती साधता येईल असे आवाहन केले. सदर जिल्हास्तरीय कार्यशाळेला गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक/ सभासद, महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद यंत्रणेतील बचत गटातील महिला, कृषी विभाग व आत्माचे अधिकारी /कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज तुमडाम, तालुका कृषी अधिकारी गोंदिया यांनी केले तर आभार अरविंद उपवंशी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, गोंदिया यांनी मानले.