महिलांचे सर्वच क्षेत्रात अतुलनीय योगदान – जिल्हा परिषद अध्यक्ष  पंकज रहांगडाले

0
21

* जिल्हा परिषदेत जागतिक महिला दिन साजरा
* सेवानिवृत्त तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी व आंगणवाडी सेविकांचा सत्कार
* तिरोडा तालुक्यातील माझी कन्या भाग्यश्री योजनेतील लाभार्थ्यांचा 25000 रुपयांचे मुदतठेव प्रमाणपत्र देऊन गौरव.
* आरोग्य विभागातील आशा आणि आरोग्य सेविका यांचा सत्कार
गोंदिया – आज महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. वैमानिक, लोको पायलट यासह सर्वच क्षेत्रात महिलांचे योगदान अतुलनीय आहे. त्यामुळेच आज देश प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात आज 29 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी दीप प्रज्वलन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण सभापती सविता संजय पुराम, समाजकल्याण सभापती पूजा सेठ, महिला व बालकल्याण समिती सदस्या विमल ताई कटरे, उषा ताई मेंढे, कल्पना वालोदे, कविता कापगते, लक्ष्मी तरोणे,किरण कुमार पारधी, जिल्हा परिषद सदस्य माधुरी रहांगडाले, जि.प.सदस्या कविता ताई रंगारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून विधिवत करण्यात आली. प्रास्ताविकातून महिला व बालकल्याण विभागाचे संजय गणवीर यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने माझी कन्या भाग्यश्री व इतर राबविण्यात येणाऱ्या योजना विषयी प्रास्ताविक मार्गदर्शन केले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती सविता ताई पुराम यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरोधात आवाज उठवून आपल्या हक्कासाठी लढण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित अतिथी यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी तर आभारप्रदर्शन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी तिरोडा विनोद चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला व बालकल्याण विभागाचे विस्तार अधिकारी विनोद जाधव, नंदकिशोर कोहळे, अनिता शहारे, साजन दादूरिया, अमित लांजेवार, आरोग्य विभागाच्या अर्चना वानखेडे, कल्याणी चौधरी यांचेसह इतर विभागातील महिला कर्मचारी यांनी सहकार्य केले.