मास्कचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
13

गोंदिया, दि. १८ : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस कोविड सकारात्मक रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. आज मंगळवारी रोजी १८ रुग्ण सकारात्मक निघाले आहेत. एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या ७४ वर पोहचली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.

        कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरीता मास्कचा वापर हे प्रभावी साधन आहे. सर्व नागरिकांनी घराबाहेर निघाल्यानंतर मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

        मास्कच्या वापरासह कोविडबाबत योग्य वर्तवणूक करावी. गर्दीच्या आणि बंदिस्थ ठिकाणी विशेषत: सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती आणि वृद्ध यांनी जाणे टाळावे. शिंकताना किंवा खोकलतांना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यू पेपरचा वापर करावा. हाताची स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे तसेच कोविड लक्षणे आढळल्यास तत्काळ कोविड चाचणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रसार व प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोविडबाबत योग्य वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.