महिला सक्षमीकरणात आलाबाद ग्रामपंचायतीची उत्तुंग झेप… !

0
9

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी आजवर उत्कृष्ट काम करुन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत.  राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावामध्ये विविध उपक्रम राबवून महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याचे यशस्वी पाऊल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील आलाबाद ग्रामपंचायतीने उचलले आहे. त्याचेच फलित म्हणून महिला-स्नेही संकल्पनेत तृतीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आलाबाद ग्रामपंचायतीला दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये गौरविण्यात आले…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समारंभात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते गावच्या सरपंच लताताई बाबुराव कांबळे, कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे व ग्रामसेवक अनिकेत संभाजी पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या आलाबाद ग्रामपंचायतीची ही उत्तुंग झेप म्हणावी लागेल…

आलाबाद हे ३६६ कुटुंबांचे १ हजार ८८३ लोकसंख्येचे छोटेसे गाव. यात महिलांची संख्या ९४८ म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक आहे. शाळाबाह्य मुली, कमी वजनाच्या मुली, अशक्त मुली यांच्यासाठी आणि ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण यासाठी आलाबाद ग्रामपंचायतीच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळेच गावात एकही शालाबाह्य मुलगी नाही. याबरोबरच गावात त्या – त्या वयानुसार कमी उंचीची मुलगी देखील नाही. गावात स्तनदा व गरोदर महिलांची विशेष काळजी घेतली जाते. वेळेत लसीकरण, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करुन महिलांना चर्चेत सहभागी करुन घेतले जाते. तसेच महिला सभेच्या वेळी अधिकाधिक महिलांना एकत्र केले जाते.

ग्रामपंचायतीमध्ये लसीकरण मोहिमेसाठी किंवा आरोग्य तपासणीसाठी महिलांना एकत्र आणणे हे तसे अवघड काम… पण आशासेविका, एएनएम, अंगवाडी सेविका यांच्या मदतीने महिलांना त्यांच्या घरी लसीकरण करुन त्यांना योग्य उपचार व मार्गदर्शन दिले जाते. किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या शिक्षकांच्या मदतीने प्राथमिक शाळा आणि हायस्कूलमध्ये जनजागृतीवर भर दिला जातो. गावाला महिला-स्नेही पंचायत बनवणे, महिला आणि मुलीं संबंधित प्रत्येक कामाची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि प्रेरिका ताई या कामांच्या नोंदी घेतात. तसेच  गरोदर, स्तनदा माता, महिला व मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात. या सर्व कामांच्या निकषावर सन २०२१-२०२२ या वर्षासाठी महिला-स्नेही संकल्पनेत ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी नोंदणी केली. महिला सक्षमीकरण आणि बाल विकासासाठी आलाबाद ग्रामपंचायतीने केलेल्या उत्कृष्ट कामाची नोंद घेत देश पातळीवरील तृतीय क्रमांकाने (२०२३) गावाला गौरविण्यात आले आहे.

 

गावामध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, विस्तार अधिकारी दिलीप माळी, अमोल मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच लताताई बाबुराव कांबळे, ग्रामसेवक अनिकेत संभाजी पाटील, ग्राम पंचायतीचे कर्मचारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांनी काम केले.

महिला-स्नेही पंचायत बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच आलाबाद मध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फिल्टर हाऊसद्वारे ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. तसेच लोकवर्गणी, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गावात सुसज्य रस्ते, जिल्हा परिषदेच्या उर्दु व मराठी शाळा आणि अंगणवाडीमध्ये विविध दर्जेदार सुविधा पुरविल्या जात आहेत. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या आलाबाद ग्रामपंचायतीचे काम अन्य ग्रामपंचायतीसाठी मार्गदर्शक म्हणावे लागेल.

  • वृषाली पाटील, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर