एक वर्षाच्या कार्यकाळात राबविल्या लोकाभिमूख योजना-जि.प.अध्यक्ष पकंज रहांगडालेंची माहिती

0
22

गोंदिया,दि.11- ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील सेवा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ योजना राबविणार असल्याची माहिती जि. प.चे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिली.
बुधवार, १0 मे रोजी जि. प.च्या कक्षात त्यांच्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी वर्षभरात झालेल्या आणि पुढील काळात करण्यात येणार्‍या अनेक विकास व लोकोपयोगी योजनांबद्दल सांगितले. पत्रपरिषदेला प्रामुख्याने शिक्षण सभापती तथा उपाध्यक्ष यशवंत गणवीर,बांधकाम सभापती संजय टेंभरे,पशु संवर्धन व कृषी सभापती रुपेश कुथे,महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, जि. प. सदस्य लक्ष्मण भगत जि. प. सदस्य हनुवत वट्टी, किशोर महारवडे, रजनी कुंभरे, भुमेश्‍वर पटले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना रहांगडाले यांनी सांगितले की, कोविडच्या प्रादुर्भावाने जि. प.ची निवडणूक वेळेत झाली नाही. दोन वषार्पासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज होते. या काळात विकास कामांना ब्रेक लागला होता. जिपच्या निवडणुका गतवर्षी जानेवारीत झाल्या. १0 मे रोजी भाजपने गोंदिया जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापित केली. आज सत्ता स्थापनेची वर्षपूर्ती झाली. समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणने, हे उद्दिष्ट घेऊन आपण काम करत आहोत. एका वर्षाच्या कार्यकाळात जि. प.ला १२२२ योजना प्राप्त झाल्या. केंद्र शासनाच्या हर घर नल, हर घर जल योजनेमार्फत जि. प. अंतर्गत २0२४ पयर्ंत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ५३ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात २८ नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार असून ३ कोटी २८ लाख ६५ हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.

अंगणवाडीतील बालकांच्या वजन मापासाठी अत्याधुनिक वजन काटे जि. प.मार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. लहान मुलामुलींना गुड टच, बॅड टचसंदर्भात माहिती मिळावी, यासाठी प्रशिक्षण घेण्यात येईल. यासाठी दीड कोटी निधीची तरतूद केली आहे. महिला, युवतींसाठी माफक दरात सेनेटरी पॅड व्हेंडींग मशिनची सोय ग्रापं कार्यालय, माध्यमिक शाळेत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना मुख्यालयी राहून सेवा देण्याचे तसेच ड्युटी चार्ट २४ तासांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दर्शनी भागावर लावून त्याचा फोटो तालुका नियंत्रण गृ्रपवर दर आठवड्याला अपलोड करण्याचे सूचित करण्यात आले आहे. हिराटोला येथे आरोग्य केंद्र स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. चांदणीटोला येथे उपकेंद्र व मोहगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे रहांगडाले यांनी सांगितले. तासिका शिक्षकांचे २ वषार्पासूनचे थकीत मानधन व मार्च २0२३ पयर्ंतचे मानधनाचे १ कोटींची तरतूद करण्याचा निर्णय वार्षिक सभेत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी तथा नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षकांना १५ टक्के प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त आवास भाडे ४६0 रुपये जिपतर्फे मंजूर करण्यात आले. कुपनलिका यांत्रिकी विभागाच्या कर्मचार्‍यांच्या मानधनात २0 टक्के वाढ तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांवर २१0 स्वयंसेवक नियुक्त करण्याचा निर्णय जि. प.ने घेतला. पीएर्मशी योजने अंतर्गत गोंदियातील १९ शाळांची निवड झाली आहे. हा आकडा राज्यात सर्वाधिक असून या शाळांच्या सर्वांगिण विकासाठी १ कोटी ८८ लाख रुपये ५ वर्षात खर्च करण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी सांगीतले. जिपच्या अख्त्यारीतील काही तलाव बीओटी तत्वावर देऊन त्यांचा विकास करण्यात येणार आहे. या तलावात बोटींग व परिसरात पर्यटन सोयी उपलब्ध करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
जि. प.च्या प्रत्येक शाळेत शुद्ध पाण्यासाठी आरो प्लँट बसविणे, शौचालयांचे बांधकाम करणे या कामांना प्राथमिकता असून, प्रत्येक ग्रापंला बॅटरी ऑपरेटेड कचरा उचल गाडी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रहांगडाले म्हणाले. जि. प.च्या व्यापारी गाळ्यांचे कोविड काळातील संपूर्ण भाडे माफ करण्यात आले असून, दर ३ वर्षाने १0 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाव तिथे गोदाम संकल्पनेनुसार प्रत्येक ग्रा. पं. क्षेत्रात शेतमाल साठवण्यासाठी गोदामांचे बांधकाम, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहनासाठी अटल क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी ३0 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे रहांगडाले म्हणाले. आपसी समन्वयातून गावाचा विकास शक्य असून यासाठी सरपंच परिषदचे आयोजन करून प्रशिक्षण देण्यात आले. बिरसा मुंडा यांच्या यांच्या जयंती दिनी १५ नोव्हेंबर रोजी जिप शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शहीदांच्या स्मरनार्थ जिप शाळांच्या वर्ग खोल्यांना शहीदांचे नाव, जिल्हा परिषेदेच्या आवारात शहीद स्तंभाचे निर्माण करण्यात येणार आहे. जिपतर्फे ओबीसी प्रवगार्साठी व्यक्तीगत योजनांसाठी २५ लाखाची तरतूद, जि. प, पं. स., ग्रा. पं. पदाधिकार्‍यांच्या विर्शामासाठी जि. प. परिसरात विर्शाम कक्षाचे बांधकाम, जि. प.च्या पशू दवाखान्यांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी पशू सुधार व सल्लागार समितीचे गठण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.