एसटीच्या “ महिला सन्मान योजनेचा ”9 लक्ष 54 हजार महिलांनी घेतला लाभ

0
18

चार आगारातून मिळाले 3 कोटीचे उत्पन्न

वाशिम, दि. 17  : महाराष्ट्राची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटीच्या महिला सन्मान योजनेचा लाभ जिल्हयातील 9 लक्ष 54 हजार 663 महिलांनी 17 मार्च ते 15 मे 2023 या कालावधीत घेतल्याने जिल्हयातील चारही आगाराला या योजनेतून 3 कोटी 28 लक्ष 90 हजार 631 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

          महाराष्ट्रातील दुर्गम व डोंगराळ भागातील प्रवाशांची नाळ आजही एसटीशी जुळली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद घेवून एसटीचा प्रवास आजही निरंतर सुरु आहे. पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या आपल्या महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकींचा अर्थात महिलांचा कुटूंबाच्या अर्थाजनात महत्वाचा वाटा आहे. राज्याच्या विकासात महिलांचे महत्वपूर्ण योगदान लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात महिलांना 50 टक्के प्रवास सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा निर्णय घेतांना या योजनेअंतर्गत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना साधी, मिडी/मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन-आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत) बस प्रवासातील तिकीट दरात 50 टक्के सवलत 17 मार्च 2023 पासून लागू केली आहे.

          जिल्हयात चार एसटी आगार असून यामध्ये वाशिम, कारंजा, मंगरुळपीर आणि रिसोड आगाराचा समावेश आहे. 17 मार्च ते 15 मे 2023 या जवळपास दोन महिन्याच्या कालावधीत वाशिम बसस्थानकावरुन 2 लक्ष 20 हजार 80 महिलांनी प्रवास केला. या प्रवासामधून एसटीला 94 लक्ष 7 हजार 895 रुपये, कारंजा डेपोतून 2 लक्ष 57 हजार 419 महिलांनी विविध ठिकाणी प्रवास केला. या प्रवासातून 76 लक्ष 45 हजार 490 रुपये, मंगरुळपीर आगारातून 2 लक्ष 79 हजार 126 महिलांनी प्रवास केला. या प्रवासातून आगाराला 85 लक्ष 20 हजार 517 रुपये आणि रिसोड आगारातून 1 लक्ष 98 हजार 38 महिलांनी प्रवास केला. या महिलांच्या प्रवासापोटी रिसोड आगाराला 73 लक्ष 16 हजार 729 रुपये उत्पन्न मिळाले.

          राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाडयात अहिल्यादेवी होळकर योजना, विद्यार्थी (शैक्षणिक) मासिक पास, विद्यार्थी (तंत्र व व्यावसायीक शिक्षण) मासिक पास, अर्जून, द्रौणाचार्य, शिवछत्रपती व दादाजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त व्यक्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, स्वातंत्र्य सैनिक, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, क्षयरोगग्रस्त व्यक्तीं, कुष्ठरोगग्रस्त व्यक्तीं, कर्करोगग्रस्त व्यक्तीं, सिकलसेल, हिमोफिलीयाग्रस्त रुग्ण तसेच एचआयव्ही बाधीत व डायलेसीस रुग्ण, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्ती, अंध व दिव्यांग व्यक्ती, अधिस्विकृतीधारक पत्रकार, आजी/माजी विधान मंडळ सदस्य, राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेले विजेते स्पर्धक, विद्यार्थी जेवणाचे डब्बे, विद्यार्थ्यांना मोठया सुट्टीत मुळगावी जाणे, आजारी आई-वडीलांना भेटणे, कँपला जाणे (वसतीगृहात राहणारे विद्यार्थी), विद्यार्थ्यांना नैमित्तीक करार, पंढरपूर आषाढी/कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचा मान मिळविलेले एक वारकरी दांपत्य, मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिकदृष्टया दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार, आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचा एक साथीदार आणि नविन योजना कौशल्य सेतू अभियानातील अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्रादरम्यानचा प्रवास, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक आणि आता महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना तिकीट प्रवासात 50 टक्के सवलत अशा 29 प्रकारच्या सवलतीच्या योजना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

          जागतिक महिला दिनाच्या महिन्यात महिलांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेवून महिला सन्मान योजनेमुळे महिलांच्या विकासाला पाठबळ मिळाले आहे. ग्रामीण भागातील महिला व मुली कामानिमित्त तसेच त्यांच्या कौटूंबिक कारणानिमित्त एसटीच्या 50 टक्के सवलतीच्या दरात प्रवास करीत आहे. गावातून तालुक्याच्या ठिकाणी, जिल्हयाच्या ठिकाणी तसेच वेगवेगळया ठिकाणी केवळ 50 टक्के तिकीट दरात त्या जाऊन आपली कामे करुन सुरक्षितपणे घरी येत आहे. महिलांना एसटी महामंडळाने महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी मोठा दिलासा दिला आहे. या योजनेमुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी भर पडत आहे.