पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

0
4

पर्यावरणपूरक उत्सवाला लोकांची वाढती पसंती

 मुंबई, दिनांक १७ : पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणे अथवा इतर काही पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा केली, आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई तसेच कोकणातील मूर्तिकार, सार्वजनिक गणेश मंडळे यांची बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

        मुख्यमंत्र्यांनी आज घोषित केलेल्या समितीत जलसंपदा, ग्रामविकास, पर्यावरण, नगरविकास, विधी व न्याय, या विभांगांचे प्रधान सचिव, सदस्य म्हणून तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव हे समितीचे सदस्य सचिव म्हणून असतील. याशिवाय आयआयटी मुंबई, नीरीचे प्रतिनिधी व डॉ शरद काळे, डॉ अजय देशपांडे यांना तांत्रिक तज्ज्ञ म्हणून या समितीत घेण्यात येईल. ही समिती अभ्यास करून आपला अहवाल शासनास सादर करेल.

      यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक डॉ इक्बालसिंह चहल तसेच इतर मनपा प्रशासक तथा आयुक्तांना  मातीच्या मूर्तीकारांना कुठलाही अडथळा येऊन न देता सुलभपणे जागा उपलब्ध करून द्यावी तसेच परवानग्या वगैरे करीता अनेक ठिकाणी धावपळ करण्याची गरज  भासू नये यासाठी एक खिडकी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी मंडप शुल्क माफ करण्यात आले होते, मात्र त्यापूर्वी जे शुल्क आकारले गेले ते मंडळांना परत करण्याची कार्यवाहीही तातडीने करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

                                      उत्साह हवा पण निसर्गाची तोडफोड नको

        मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव व इतर उत्सव साजरे झाले पाहिजेत यावर राष्ट्रीय हरित लवाद, सर्वोच्च न्यायालय यांनी निर्देश दिले आहेत. आपण टप्प्याटप्प्याने याकडे वाटचाल करतो आहोत. कृत्रिम तलावात घरगुती गणेश विसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. लोकांचा यासाठी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मातीच्या मूर्ती, कागदी लगदा वापरून मूर्ती, किंवा पेंढा वापरून देखील मूर्ती मोठ्या प्रमाणावर तयार होत असून लोक देखील अशा मूर्तींना पसंती देत आहेत. पर्यावरणाचा समतोल ठेवला गेला पाहिजे. सण आणि उत्सव साजरे करायचे पण निसर्गाची तोडफोड नको हे तत्व आपण ठेवले पाहिजे. माती आणि शाडूचे मूर्तिकार असो किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनविणारे असोत, पर्यावरणाची हानी होऊ नये हे यावर सर्वांचेच एकमत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उंच मूर्तींचे आगमन जसे आपण सगळे पावित्र्य ठेऊन करतो तसेच त्यांचे विसर्जनही सन्मानपूर्वक आणि पावित्र्य राखून झाले पाहिजे.

     गेल्या वर्षीपासूनच आपण आपले सण, उत्सव उत्साहात साजरे करण्यास सुरुवात केली आहे. मूर्तीवरील उंचीवरील निर्बंध उठविले, परवानग्या सुलभ केल्या आहेत अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

                                कृत्रिम तलाव वाढवा, स्पर्धांचे आयोजन करा

       यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृत्रिम तलाव वाढावेत, पर्यावरणपूरक उत्सवासाठी जास्तीत जास्त स्पर्धा घ्याव्यात, चांगली पारितोषिके द्यावीत यासाठी नियोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

       याप्रसंगी मुंबई महानगरपलिका  प्रशासक तथा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यावेळीही गणेशोत्सवासाठी सुलभ परवानग्या व मूर्तिकारांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मुंबईत ३६ ते ४० टक्के कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. २ लाख घरगुती गणेश मूर्ती आणि १० हजार सार्वजनिक गणेश मंडळे असल्याची माहिती त्यांनी दिली.

       प्रारंभी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव प्रवीण दराडे यांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यामागची भूमिका तसेच राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकारांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी आमदार जयंत पाटील, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिति चे अध्यक्ष नरेश दहीबावकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्यवाह सुरेश सरनोबत यांनी देखील आपले विचार मांडले. प्रशासनातर्फे या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ आदींची उपस्थिती होती.