नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नव्या दोन वाघिणींचे आगमन

0
42

नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेलवनमंत्री सुधीर मुनगंटीवार

विदर्भ जगाचे टायगर कॅपिटल

गोंदिया, दि.२० :- संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणींचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील जंगल उपयुक्त आहे. वाघिणींच्या आगमनामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्य वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प नैसर्गिक अधिवासासाठी उत्तम ठिकाण असून आज सोडण्यात आलेल्या वाघिणींच्या प्रजननातून वाघांची पुढील पिढी दर्जेदार निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

           ब्रम्हपुरी भूभागातून आणण्यात आलेल्या वाघीण नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे, अशोक नेते, आमदार विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे,  पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपूर संदीप पाटील, गोंदिया निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यावेळी उपस्थित होते.

          विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल झाले आहे असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. भारत सरकारने पहिल्या टप्प्यात पाच वाघांचे स्थानांतरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवेगाव-नागझिरा प्रकल्पात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी ११ वाघ असून वीस वाघ अधिवास क्षमता असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांसाठी नवेगाव-नागझिरा आकर्षण केंद्र ठरणार आहे.

         पुढील टप्प्यात तीन वाघांचे स्थानांतरण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. नवेगाव नागझिरा प्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्थानिक ४०० युवकांना प्रशिक्षण तसेच शंभर वाघमित्र नेमले आहेत. वाघमित्रांना दोन हजार रुपये सन्माननिधी देण्यात येतो. तसेच पर्यटकांसाठी अत्याधुनिक सहा वाहने देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        वाघांचे संवर्धन व स्थानांतर (Conservation Translocation of Tigers) या उपक्रमा अंतर्गत एकूण 4-5 मादी वाघिणींना ब्रह्मपुरी भूभागातून नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात स्थानांतरीत करणे प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात 2 मादी वाघिणींचे नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे आज स्थलांतर करण्यात आले आहे. दोन्ही वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या गाभा भागात सोडण्यात आले. वाघिणींना सोडल्यानंतर सॅटेलाईट जीपीएस कॉलर व व्हिएचएफ (Satellite GPS collar व VHF) च्या सहाय्याने दोन्ही वाघिणींचे 24 x 7 सक्रियपणे सनियंत्रण केले जाईल. संपूर्ण सनियंत्रणाचे कार्य हे कमांड आणि कंट्रोल रूम साकोली येथून नियंत्रीत केले जाणार आहे. या दोन स्थलांतरीत वाघिणींच्या निरीक्षणानंतर व उर्वरित घटक लक्षात घेऊन इतर मादा वाघांना टप्प्या-टप्प्याने स्थानांतरीत केले जाईल.

       या उपक्रमामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ राखीव क्षेत्रात भविष्यात वाघाच्या संखेत वाढ होवून या प्रकल्पात पर्यटनाला चालना मिळू शकते. स्थानिकांना उपजिविकेच्या संधी निर्माण होतील तसेच जास्त व्याघ्र संख्या असलेल्या ब्रह्मपुरी भूभागातील मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.