एकबुर्जी प्रकल्पावर दिले मान्सुनपूर्व प्रशिक्षण -आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पुढाकार

0
12

 वाशिम, दि. 25  : वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम यांच्या अंतर्गत  एक दिवशीय मान्सूनपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिमचे तहसीलदार ज्ञानेश्वर घ्यार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आधिकारी शाहू भगत, पोलीस निरीक्षक श्री. साळुंके, नायब तहसीलदार श्रीमती पुरोहित, स्विय सहाय्यक धर्मराज चव्हाण, अग्नीशमन अधिकारी श्री. तिरपुडे, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अनिल वाघ, अशांत कोकाटे, आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे दीपक सदाफळे व श्याम सवाई, बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी युनिटचे शिक्षक अमोल काळे यांची उपस्थिती होती.

       आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. भगत यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, वृत्तपत्रात नेहमी वाचतो, अतिवृष्टी झाली, पुर आला, वीज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झाले. अलीकडे हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्याला सामना करावा लागत आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन केले जात असल्याचे सांगितले.

          प्रशिक्षक श्री. वाघ म्हणाले, आताच आपण कोरोना महामारीचा सामना केला. यामध्ये समुदाय संघटित करून निर्बंध घालून नियमावली लावली. या महामारीपासून आरोग्याचे व्यवस्थापन केले. मानवी जीवनात येणाऱ्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करून त्याचे नियोजन व व्यवस्थापन केले जाते. अचानक आलेल्या आपत्तीचा सामना करतांना त्यावर प्रथमोपचार कसा केला पाहिजे. हार्ट अटॅक, रोड एक्सीडेंट, सर्पदंश, त्सुनामी, आग, वीज, एखादा व्यक्ती पुरात वाहून गेला, तलावात बुडाला, विहिरीमध्ये पडला असेल तर त्याला बाहेर कसे काढले पाहिजे आणि त्याला प्रथमोपचार कशा पद्धतीने दिला पाहिजे अशा अनेक मुद्यांवर यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

          श्री. कोकाटे, श्री. सोळंके व श्री. सवाई यांनी देखील आपत्तीविषयक विविध विषयावर मार्गदर्शन केले. श्री. सदाफळे यांनी बोटीने शोध कसा घ्यावा व बचाव कसा करावा याचे बोट प्रात्यक्षिक करून दाखविले.

          जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित केलेल्या या एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नदी काठावरील गावचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व पट्टीचे पोहणारे व्यक्ती यांचा सहभाग होता.

          हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या मार्गदर्शनात व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला. सूत्रसंचालन अशांत कोकाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार शाहू भगत यांनी मानले.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार कैलास देवळे, धनंजय कांबळे, गजानन उगले, विनोद मारवाडी, रवि अंभोरे, नागोराव खोंड, क्रिश बंगारे व श्री. लोखंडे यांनी परिश्रम घेतले.

          आपत्ती व्यवस्थापनाचा उद्देश स्थानिक लोकांमध्ये आपत्तीशी सुनियोजित लढा देण्याची संस्कृती निर्माण करणे. आपत्ती पूर्व नियोजन हा संस्कृतीचा एक भाग आहे, हे स्थानिकांच्या मनात बिंबवणे. आपत्ती तयारीचा स्तर उंचावणे. धोका व वाईट परिस्थितीचे योग्य विश्लेषण करून आपत्ती प्रसंगातील जीवित व वित्त हानी कमीत कमी स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करणे. उपलब्ध संसाधनांची जाणीव करुन देणे. प्रशासन व गाव यामध्ये समन्वय साधून गाव प्रशासनास मजबूती प्राप्त करुण देणे हा आहे.