पी.एम.किसान योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी आणि बँक खाते आधार संलग्न करावे- हिंदुराव चव्हाण

0
14

गोंदिया, दि.31 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी एम किसान) अंतर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण जून महिन्याच्या पहिल्या आठवडयात होणार आहे. केंद्र शासनाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण करणे तसेच भूमी अभिलेख नोंदणीप्रमाणे माहिती अद्यावत करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूण घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

    ज्या लाभार्थींचे ई-केवायसी व बँक खाती आधार संलग्न झाली नाहीत, त्यांना योजनेचा पुढील हप्ता अदा होणार नाही. केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे राज्यात १ मे पासून जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली गावपातळीवर यासंदर्भात मोहिम राबविण्यात येत आहे. या माहिमेमध्ये लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांने प्रधानमंत्री किसान पोर्टलवरील फार्मर कॉर्नरमधील ई- केवायसी ओटीपी आधारित सुविधेद्वारे अथवा सामायिक सुविधा केंद्रामध्ये (सीएससी) अथवा पी.एम. किसानच्या नवीन अॅपद्वारे चेहरा ओळख (फेस डिटेक्शन) माध्यमातून ई-केवायसी प्रमाणिकरण करावे.

        संबंधित लाभार्थ्याला जर बँक खाते आधार संलग्न करायचे असेल तर त्याने त्यांच्या बँकेत जाऊन बँक खात्यास आधार संलग्न करावा किंवा पोस्टमास्तर यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते उघडावे. लाभार्थ्याचे जर भूमी अभिलेख नोंदणीप्रमाणे अद्यावतीकरण करायचे असल्यास त्याने आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे गावच्या तलाठी अथवा संबंधित तहसील कार्यालयास संपर्क साधून सर्व बाबींची पूर्तता व १४ व्या हप्त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.